
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांप्रमाणेच रायगड जिल्ह्यातील आंबा उत्पादक बागायतदारांनाही आता नुकसानभरपाई मिळणार आहे. ही नुकसानभरपाई तातडीने देण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी किशनराव जावळे यांनी विमा कंपन्यांना दिले आहेत. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
रायगड जिल्ह्यातील अनेक भागात आंबा पिकाची लागवड केली गेली आहे. मात्र बेभरवशी हवामानाचा गेल्या काही वर्षांत या पिकाला मोठा फटका बसला आहे. नुकसानभरपाई मिळावी यासाठी कोकणातील शेतकरी आंब्याचा विमा उतरवतात. मात्र यामध्ये शासनाने रायगड जिल्ह्यावर मोठा अन्याय केला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तुलनेत रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्याचा प्रीमियम पाच पटीने अधिक आहे. त्यामुळे गेल्या वर्षी जिल्ह्यातील 7 हजार 600 शेतकऱ्यांपैकी फक्त पाच हजार शेतकऱ्यांनीच आपल्या आंबा बागेचा विमा उतरवला होता. या विम्याची नुकसानभरपाई अद्यापि मिळालेली नाही. ही नुकसानभरपाई तातडीने मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता.
मोकल यांनी केलेल्या पाठपुराव्यानुसार कोकण विभागाचे शिवाजी आमले यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. त्यानंतर सर्व हाल चाली वेगाने झाल्या. गुरुवारी झालेल्या बैठकीत रायगडचे जिल्हाधिकारी किशनराव जावळे यांनी शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याचे आदेश विमा कंपन्यांना दिले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला रायगड जिल्हा कृषी अधिकाऱ्यांसह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनीच्या व्यवस्थापकांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानभरपाईचे काम तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.
























































