Tokyo Olympics मध्ये देशासाठी इतिहास रचणाऱ्या खेळाडूचा प्रशिक्षकावर खळबळजनक आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Photo Courtesy - Manika Batra Facebook Page

टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या टेबल टेनिस खेळाडू मनिका बात्रा हिने टेबल टेनिसच्या राष्ट्रीय प्रशिक्षकावर खळबळजनक आरोप केला आहे. आपण केलेल्या आरोपांना बळ देणारे पुरावेही आपल्याकडे असल्याचं मनिकाने म्हटलं आहे. योग्य वेळी हे सगळे पुरावे आपण सादर करू असं तिने म्हटलं आहे. मनिका बात्रा हिने नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत महिला एकेरी टेबल टेनिसमध्ये तिसरी फेरी गाठत इतिहास रचला होता.

manika-batra-fb-image-red-tshirt

मनिका बात्रा हिला टेबल टेनिस महासंघाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटिसीला उत्तर देताना मनिका हिने प्रशिक्षक सौम्यपीद रॉय यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. तिने केलेल्या आरोपांत म्हटलंय की रॉय यांनी ऑलिम्पिक स्पर्धेतील पात्रतेसाठी खेळवण्यात आलेल्या सामन्यातला एक सामना हरण्यास सांगितला होता. याच कारणामुळे ऑलिम्पिकच्या महिला एकेरी स्पर्धेसाठी रॉय यांची मदत घेण्यास आपण नकार दिला होता असं मनिकाने म्हटलंय. जर रॉय प्रशिक्षक म्हणून सामन्यादरम्यान बसले असले तर मी सामन्यावर लक्ष्य केंद्रीत करू शकले नसते असं मनिकाचं म्हणणं आहे. यामुळेच राष्ट्रीय प्रशिक्षकाशिवाय आपण सामना खेळायचं ठरवलं होतं असं मनिकाने म्हटलंय.

manika-batra-fb-image-blue-tshirt

ज्या प्रकाराबद्दल मनिकाने उत्तरात उल्लेख केलाय तो प्रकार 2021 मध्ये दोहा इथे घडला होता. रॉय यांच्या तालमीत तयार झालेल्या खेळाडूविरूद्ध आपल्याला हरण्यास सांगितलं होतं जे एक प्रकारचं मॅच फिक्सिंग होतं असं मनिकाचं म्हणणं आहे. कारण हा सामना मनिका हरली असती तर तिच्याऐवजी रॉय यांची शिष्या ऑलिम्पिकमध्ये गेली असती.