
काही वर्षांपासून अशांत असलेल्या मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा उफाळून आली आहे. सोमवारी रात्री बिष्णुपूर जिह्यात काही बंडखोरांनी एका घरामध्ये बॉम्ब फेकला. त्याच्या स्फोटात आईच्या कुशीत शांतपणे झोपलेल्या एका पाच वर्षांच्या मुलाचा आणि सहा महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेनंतर संतप्त झालेल्या स्थानिकांनी आज सकाळ तीव्र आंदोलन केले. आंदोलकांनी रस्त्यावर जाळपोळ करत जवळच्या सीआरपीएफ छावणीवर हल्ला केला. आंदोलकांना रोखण्यासाठी सीआरपीएफने केलेल्या गोळीबारात 2 नागरिकांचा मृत्यू झाला तर, पाच जण जखमी झाले. या हिंसाचारानंतर बिष्णुपूर, इंफाळ पूर्व आणि पश्चिमसह काकचिंग या चार जिह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
बिष्णुपूर जिह्यातील मोइरांग ट्रोंगलाओबी भागात एका घरामध्ये बंडखोरांनी बॉम्ब फेकला. त्यात पाच वर्षांचा मुलगा आणि अवघ्या सहा महिन्यांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. बॉम्बस्फोट झाला त्यावेळी मुले त्यांच्या आईसोबत झोपली होती. झोपेमध्येच चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत झाला. त्यांची आई गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. हा परिसर चुराचंदपूरच्या डोंगराळ प्रदेशाला लागून आहे. या ठिकाणी कुकी आणि मैतेई समुदायांमध्ये 2023 पासून संघर्ष सुरू आहे. बॉम्बस्पह्टाच्या घटनेनंतर स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यांनी मंगळवारी सकाळी परिसरातील पेट्रोल पंपावर उभे असलेले दोन पेट्रोल टँकरसह जाळले तसेच जवळच्याच सीआरपीएफच्या कॅम्पवरही हल्ला केला. मोइरांग पोलीस ठाण्याबाहेर टायर जाळले. सीआरपीएफने प्रत्युत्तर देताना जमावावर गोळीबार केला. मणिपूरमध्ये बिष्णुपूर, काकचिंग इंफाळ पूर्व आणि पश्चिम या जिह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून तीन दिवसांसाठी इंटरनेट बंद केले आहे.
जीवलगांचे मृतदेह मणिपूरची जनता कधीपर्यंत मोजत राहणार – राहुल गांधी
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या घटनेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे. मोदी सरकार एवढे संवेदनशून्य झाले आहे की मणिपूरची बालके या देशाचीच मुले असून आपले भविष्य आहेत. हे सरकार कधी जागे होणार? मणिपूरची जनता कधीपर्यंत जीवलगांचे मृतदेह मोजत राहणार, असा सवाल राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून केला आहे.
बॉम्बस्पह्टाचा तपास ‘एनआयए’कडे सोपवला
बॉम्बस्फोटप्रकरणी मणिपूरचे मुख्यमंत्री वाय. खेमचंद सिंह यांनी मंगळवारी उच्चस्तरिय बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी सांगितले की, या घटनेचा तपास ‘एनआयए’कडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा अतिशय निर्दयी हल्ला असून राज्यातील वातावरण बिघडवण्याची इच्छा असणाऱ्यांनी हा हल्ला केल्याचे सिंह म्हणाले.



























































