
व्यक्ती बघून नामांकित कंपनीच्या नावाने बनावट घड्याळे अवाच्या सवा किंमतीत विक्रीचा मनिष व अल सबा मार्केटमध्ये सुरू असलेला बोगस धंदा आर्थिक गुन्हे शाखेच्या सी बी कंट्रोल पथकाने उद्ध्वस्त केला. पोलिसांनी मार्केटमधील काही दुकानांवर छापे टाकून तब्बल एक कोटी सहा लाख 76 हजार 500 रुपये किंमतीचा बनावट घड्याळ्यांचा साठा जप्त केला.
मनिष व अल सबा मार्केटमधील काही दुकानात डिझेल, फॉसिल, अरमानी, मायकल फॉर्स आदी नामांकित कंपनीच्या नावाने बनावट घड्याळे विकून नागरिकांची फसवणुक केली जात असल्याची तक्रार सी बी कंट्रोल पथकाकडे करण्यात आली होती. त्या तक्रारीची शाहनिशा केली असता ते दुकानदार व्यक्तीचा दर्जा बघून वाटेल त्या किंमतीत हि बनावट घड्याळे विकत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे प्रभारी निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय संतोष ब्यागेहळ्ळी, रुपेश दरेकर तसेच महेंद्र जाधव, चंद्रकांत वलेकर, महेश नाईक, महेंद दरेकर, शेखर भंडारी, संतोष पाटील, नितीन मगर, भरत खारवी, रोहन शेंडगे, हिना राऊत, संगीता गिरी यांची सहा पथके बनवून बुधवारी मनिष व अल सबा मार्केटमधील काही दुकानांवर छापे टाकण्यात आली. यावेळी दुकानदार बनावट घड्याळे विकताना रंगेहाथ सापडले.
या कारवाईत पथकाने डिझेल, फाँसिल, अरमानी, मायकल फाँर्स , जी शाँक या कंपनीच्या नावाने विक्रीसाठी ठेवलेली तब्बल दोन हजार 82 बनावट घड्याळे जप्त करण्यात आली. तर हा काळाबाजार करणाऱ्या पाच दुकानदारांना पकडण्यात आले. मुद्देमाल व दुकानदारांना पुढील कारवाईसाठी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मनिष मार्केट व अल सबा मार्केटमध्ये पोलिसांनी इतकी मोठी कारवाई केल्याने अन्य दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.































































