सीबीआयकडून मनीष सिसोदिया यांच्या लॉकरची झडती, काय मिळालं ते सिसोदियांनी सभागृहात सांगितलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयने मंगळवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या बँक खात्याची झडती घेतली. गाझियाबादमधील वसुंधरा सेक्टर 4 मधल्या पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रँचमध्ये सिसोदिया यांचे खाते आहे. या झडतीमध्ये सीबीआयच्या अधिकाऱ्यांना काय मिळाले याची माहिती स्वत: सिसोदिया यांनी दिल्ली विधानसभेत दिली.

विधानसभेत बोलत असताना सिसोदिया म्हणाले की सीबीआयला माझ्या बँक लॉकरमध्ये 70 हजार रुपयांचे सामान मिळाले. सीबीआयचे पथक 14 तास माझ्या घरी होते, मात्र त्यांना काहीच मिळाले नाही, ज्यामुळे मला क्लीन चिट मिळाली आहे. काही माध्यमांनी सिसोदिया यांच्या लाँकरमधून काही कागदपत्रे मिळाल्याचं वृत्त चालवलं होतं. यावर कोणती कागदपत्रे मिळाली असा सवाल सिसोदिया यांनी विचारला आहे. माध्यमांनी सत्याच्या बाजूने रहावे असे आवाहन सिसोदिया यांनी माध्यमांना केले आहे. सिसोदिया यांनी भाजपवर टीका करताना म्हटले की यांच्या पक्षाने म्हटले की अरविंद केजरीवाल हे प्रश्नांची उत्तरे देत नाही, मात्र आम्ही सगळअया प्रश्नांची उत्तरे दिली असून आता भाजपकडे प्रश्नच उरलेले नाहीयेत.

दिल्लीतील मद्य धोरणावरून आप सरकार आणि केंद्र सरकारमध्ये संघर्ष वाढला असतानाच आता सीबीआय आणि आपमध्येही संघर्ष होत आहे. आतापर्यंत या प्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निकटवर्तीयांची चौकशी करण्यात आली आहे. तसेच सिसोदिया यांच्या घरावरही धाड टाकण्यात आली होती. ही कारवाई तब्बल 14 तास सुरू होती.

सीबीआय मंगळवारी आपले बँक लॉकर तपासण्यासाठी येणार असल्याची माहिती सिसोदिया यांनी ट्विटरवर दिली. सीबीआयने 19 ऑगस्टला आपल्या घरावर धाड टाकली. 14 तासांच्या या कारवाईत त्यांच्या हाती काहीच लागले नाही. आता बँक लॉकरमध्येही त्यांना काहीही मिळणार नाही. तरीही सीबीआयचे स्वागत आहे. त्यांना तपासात आपण आणि आपले कुटुंबिय पूर्ण सहकार्य करू, असे सिसोदिया यांनी सांगितले.

आप फोडा, भाजपात या! सिसोदियांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया काही दिवसांपूर्वी गुजरात दौऱयावर गेले होते. या दौऱयापूर्वी सिसोदिया यांनी ट्विट करून भाजपचा भंडाफोड केला होता. सिसोदिया म्हणाले, ‘मला भाजपने दोन ऑफर दिल्या आहेत. ‘आप’ फोडा आणि भाजपात या आणि मुख्यमंत्री बना ही पहिली ऑफर आहे. तर दुसरी ऑफर म्हणजे, ‘भाजपचे ऐकल्यास सीबीआय, ईडीची सर्व प्रकरणे बंद करू.’’

मी राजपूत आहे. भ्रष्ट आणि कारस्थानी लोकांसमोर झुकणार नाही. माझ्यावरील सर्व खटले खोटे आहेत. तुम्हाला जे करायचे ते करा, असे सिसोदिया यांनी ट्विटद्वारे भाजपला फटकारले आहे.