
आग्रीपाडा येथील टँक पखाडी रोडवरील मिलिंद नगर सफाई कर्मचारी वसाहतीचा पुनर्विकास जलदगतीने करा, अशी मागणी शिवसेना आमदार मनोज जामसुतकर यांनी आज विधानसभेत औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे केली.
आग्रीपाडा येथील टँक पखाडी रोडवरील मिलिंद नगर सफाई कर्मचारी वसाहतीचे आश्रय योजनेंतर्गत मुंबई पालिकेमार्फत पुनर्विकासाचे काम 2021 पासून सुरू आहे. गेल्या 2-3 वर्षांपासून ते काम पूर्णपणे थांबले आहे. ते का थांबवले याबाबत कोणतीच माहिती सफाई कामगारांना देण्यात आलेली नाही, त्यामुळे ते संभ्रमात आहेत. सदर वसाहतीत 74 सदनिकांमध्ये सफाई कामगार पिढय़ान्पिढय़ा वास्तव्य करीत आहेत. सफाई कर्मचाऱयांच्या सेवा निवासस्थानांचा पुनर्विकास करताना त्यांना त्याच ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे, परंतु अद्यापपर्यंत महापालिकेकडून त्यांना घरे देण्यात आलेली नसल्याचे जामसुतकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. शासनाने याप्रकरणी तातडीने चौकशी करून पुनर्विकासाचे काम संथगतीने करणाऱया ठेकेदार पंपनी व संबंधित अधिकाऱयांवर कठोर कारवाई करावी, असे ते म्हणाले.
सफाई कामगारांत नैराश्याचे वातावरण
मिलिंद नगरच्या पुनर्विकासाच्या कामांना गती देऊन तातडीने पुनर्विकास करण्याची मागणी भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाने मुंबईचे पालकमंत्री, मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प), कार्यकारी अभियंता, उपायुक्त यांच्याकडे फेब्रुवारी 2024 मध्ये लेखी निवेदनाद्वारे केली आहे, मात्र एक वर्षाचा कालावधी उलटला तरीही अद्याप कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे सफाई कामगारांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे, असे जामसुतकर यांनी सांगितले.