मराठय़ांची एकी दाखवा, आंदोलनात सहभागी व्हा! मनोज जरांगे यांचे आवाहन

न्याय्य हक्कासाठी आंदोलन करणे, रास्ता रोको करणे, निवेदन देणे हा लोकशाहीने आम्हाला दिलेला अधिकार आहे. त्यामुळे मराठय़ांनी एकी दाखवून 24 फेब्रुवारीला होणाऱया आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी केले.

आंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर कडाडून टीका केली. मुख्यमंत्र्यांचे विश्वासू मंगेश चिवटे हे मसुद्यात दुरुस्ती करून आणतो असे सांगून गेले ते अजूनही परतले नाहीत. सग्यासोयऱयांच्या संदर्भात सरकारने भूमिका स्पष्ट केली पाहिजे, त्याचबरोबर या अध्यादेशाची अंमलबजावणीही झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. कदाचित सरकारवर कुणाचा दबाव असेल, येवलावाल्यांचाही असू शकतो, अजित पवारही त्याला घाबरतात, असा टोला त्यांनी छगन भुजबळ यांचे नाव न घेता लगावला. 1 मार्चला आम्ही सगळय़ा लोकप्रतिनिधींना आंतरवालीत बोलावले आहे. आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची पाटी आम्ही खुर्च्यांवर लावून ठेवणार आहोत, असे ते म्हणाले.