जरांगे पाटील यांच्या पायांना सूज, अंगात ताप असल्याने एक सभा रद्द

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने घोंघावत निघालेले मराठा आंदोलकांचे वादळ शुक्रवारी पहाटे नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये धडकले. हे आंदोलक आज चालत मुंबईच्या दिशेने कूच करणार असून प्रजासत्ताक दिनापासून ते आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत.

या आंदोलनाचे नेतृत्व करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती नवी मुंबईत मोर्चा आल्यानंतर बिघडली. त्यांच्या पायाला सूज आली असून त्यांना तापही भरला आहे. गुरुवारी रात्री त्यांची एक सभा होणार होती मात्र ती प्रकृती अस्वास्थ्यामुळे रद्द करण्यात आली. जरांगे पाटील यांनी शुक्रवारी सकाळी ध्वजारोहण केले. आज होणारी सभा डॉक्टरांनी जरांगे यांच्या प्रकृतीची पाहणी केल्यानंतर होईल अथवा नाही हे कळेल असे आयोजकांतर्फे सांगण्यात आले आहे.

मराठा आंदोलकांनी आझाद मैदानातच आंदोलनाचे व्यासपीठ बांधण्याची तयारी सुरू केली आहे अशी माहिती मराठा आंदोलनाचे वीरेंद्र पवार यांनी दिली. आम्ही यापूर्वीच सरकारशी पत्रव्यवहार केला आहे. आंदोलन आझाद मैदानातच होणार.. आरक्षण मिळवणार, असा नाराच मनोज जरांगे-पाटील यांनी यावेळी दिला.