डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून हलायचं नाही, हजारो आंदोलकांसह मनोज जरांगे-पाटील यांचा आझाद मैदानातून निर्धार

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटीतून रवाना झालेले मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले आहे. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचले असून हजारो आंदोलकांच्या उपस्थितीत त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून हलायचं नाही असा निर्धार व्यक्त केला.

मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून आमरण उपोषणाला सुरुवात केली. तत्पूर्वी आझाद मैदानात उपस्थित हजारो मराठ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी इथे आलो आहोत. आपण लोकांच्या बुद्धीने चाललो म्हणून आपल्या समाजाचे 70 वर्ष वाटोळे झाले हे विसरू नका. एकजुटीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल यासाठी ताकद लावायची आहे.

मुंबईला जाऊन आझाद मैदानात आमरण उपोषण करायचे ठरले होते आणि उपोषण सुरू केले आहे. सरकार सहकार्य करत नव्हते म्हणून करोडो मराठ्यांनी मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायचे ठरवले होते. पण आता सरकारने आपल्याला आंदोलनाची परवानगी दिली आहे, त्यामुळे दोन तासात मुंबई मोकळी करा. पोलीस बांधवांना नाराज करू नका, ट्रॅफिक जाम करू नका, असे आवाहन जरांगे यांनी केले.

बऱ्याच जणांना वाटले पाय ठेऊ द्यायचा नाही, पण मराठे मांड्या घालून बसले. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही हा माझा शब्द आहे. सरकारने गोळ्या घातल्या तरी बलिदान द्यायला तयार आहे, पण मागे हटायला तयार नाही. समाजासाठी मैदानात येऊन मी मरण पत्करायला तयार आहे. मराठ्यांना विजयी केल्याशिवाय आणि डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हलायचंच नाही, असेही ते म्हणाले.