
‘यंदा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातला गणपतीच मुंबईत बसणार आहे. आरक्षणासाठी मराठ्यांचे वादळ मुंबईत घोंगावणारच, कोणीही आडवे आले तरी त्याला सरळ करून मुंबईत जाणारच!’ असा निर्धार मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.
मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी २९ ऑगस्टपासून मुंबईत आंदोलन सुरू होणार असून त्यासाठी मराठा कार्यकर्ते २७ ऑगस्ट रोजी आंतरवालीतून कूच करणार आहेत. गणेशोत्सवाचा प्रारंभही याच दिवशी आहे.
गुरुवारी लातूर येथे मराठा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा वादळाला आडवे येण्याचा विचारही करू नका, जे आडवे येतील त्यांना सरळ करून मुंबईत जाणार म्हणजे जाणारच! असा निर्धार व्यक्त केला. गणेशभक्तांची कोणतीही गैरसोय होणार नाही. उलट महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील गणपतीच मुंबईत बसणार आहे. त्या अनुषंगाने १ लाख मराठा स्वयंसेवक तयार करण्यात आले असून प्रसंगी ते मुंबईतील गणेश मंडळांना मदत करतील, असेही त्यांनी सांगितले.
प्रताप सरनाईक यांच्यासमोर घोषणाबाजी
राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली. मात्र त्याचे फलित समजू शकले नाही. मराठा कार्यकर्त्यांनी प्रताप सरनाईक यांच्यासमोरच प्रचंड घोषणाबाजी केली.