Maratha Reservation Row आमच्या पैशांवर बासुंदी, गुलाबजामून खाता… किती 307 लावता ते लावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आमच्या पैशांवर बासुंदी, गुलाबजामून खाता आणि आमच्यावरच दमदाटी करता. एकाही मराठा आंदोलकावर गुन्हा दाखल तर करून बघा! तुम्हाला काय करायचे ते करा, किती 307 लावता ते लावा… पण हे करताना परिणामांचीही चिंता करा, अशा कडक शब्दांत मनोज जरांगे-पाटील यांनी राज्याचे गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांची उतरवली. सरकारने घेतलेले कोणतेही निर्णय आम्हाला मान्य नाहीत. रात्रीतून निर्णय घ्या आणि विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा निर्णय घ्या, नाहीतर उद्यापासून पाणी घेणे बंद करणार असल्याचा स्पष्ट इशारा जरांगे यांनी दिला.

बीडमध्ये पोलिसांनी मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई ताबडतोब थांबवा; नाहीतर 10 लाख लोकांना घेऊन मी स्वतः जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बसेन, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला. बीडचे पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी जातीयवादी असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आतून खोडय़ा काय करता, त्यापेक्षा बांगडय़ा भरा
बीड, जालन्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे, त्यावरून मनोज जरांगे यांनी सरकारची चांगलीच सालटी काढली. आतून काय खोडय़ा करता, त्यापेक्षा बांगडय़ा भरा, असे जरांगे म्हणाले. इंटरनेट बंद करण्याशिवाय सरकारला दुसरे काय येते? काही झाले की तिकडे दिल्लीला अमित शहांकडे जातात. त्यापेक्षा मलाच शहांचा नंबर द्या, मी बोलतो त्यांच्याशी. खरी परिस्थिती मी सांगतो त्यांना, असे खडे बोलही त्यांनी सुनावले. इंटरनेट सुरू करा नाही तर ते टॉवर घेऊन जा, असे ते म्हणाले. ‘राज्यातील वातावरण चिघळवण्यात खास करून एक उपमुख्यमंत्री जबाबदार आहे. काडय़ा करण्यातच त्यांना रस आहे. कसली रंगीबेरंगी माणसे जमवलीत. यांच्यामुळेच भाजप संपत आलीय.’ असेही ते म्हणाले.

आमचे आरक्षण फुकट खाता
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले तर ओबीसी समाजाच्या भावनांचा भडका उडेल, अशी भीती दाखविण्यात येत आहे. आमचे आरक्षण खाता. 37 टक्के लोकसंख्येला 30 टक्के आरक्षण, हा कोणता न्याय आहे. उतराच रस्त्यावर, करा आंदोलन. कोण कोण आंदोलन करतो ते पाहून घेऊ, तुम्हाला मराठय़ांची गरज नाही का, असा सवालही मनोज जरांगे यांनी केला. सरकारच्या भुलभुलैयात अडकू नका, असा सल्लाही त्यांनी ओबीसी समाजाला दिला.