
माझी बदनामी करून मला समाजापासून तोडण्याचा डाव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टाकत आहेत. जर मला समाजापासून तोडण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रात 48 पैकी एकही भाजपाचा खासदार निवडून येणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी वडवणी येथील संवाद बैठकीत दिला.
गुरुवारी वडवणीत जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मराठा समाजाची संवाद बैठक सायंकाळी सहा वाजता पार पडली. यावेळी एक लाख मराठा बांधव उपस्थित होते. बैठकीमध्ये पाटील यांनी मार्गदर्शन केले. फडणवीस यांनी सभागृहामध्ये समाजाविरुद्ध आरडाओरड केली. वेळोवेळी मराठा समाजाचे आंदोलन फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत.
त्यांनी आतापर्यंत मराठा समाजाचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला. आता त्यांनी माझे फोटो आवाज एडिटिंग करून बदनाम करण्याचा दावा केला आहे. मी देवेंद्र फडणवीस यांच्या कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही. मराठा समाजापासून मला तोडण्याचे प्रयत्न करीत आहेत. मला जेलमध्ये जरी टाकलं तरी मी समाजापासून लांब जाणार नाही, असे जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितले. मी आंदोलनातून मराठा समाजाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. देवेंद्र फडणवीस मला समाजापासून तोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु माझ्या नादी लागू नका. महाराष्ट्रात एकही भाजपचा खासदार निवडून येणार नाही, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

























































