मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. सरकारने मागितली म्हणून 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. ठरलेल्या मुदतीतच आरक्षण मिळाले पाहिजे, नसता सरकारची खैर नाही, सरकारला पळता भुई थोडी होईल, असा स्पष्ट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. आरक्षण मिळाल्यानंतर छगन भुजबळ यांचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचेही ते म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आज नांदेड तसेच हिंगोली जिल्हय़ांत सभा झाल्या. यावेळी बोलताना जरांगे यांनी आंतरवाली येथे झालेल्या लाठीहल्ला प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यावरून सरकारला खडे बोल सुनावले. वृद्ध महिला, लहान मुलांवर लाठय़ा चालवणारे निर्दयी सरकार मी आजपर्यंत पाहिले नाही. दोन दिवसांत गुन्हे मागे घेणार असे आश्वासन सरकारने दिले होते. आता महिना उलटून गेला. पण एकही गुन्हा मागे घेण्यात आला नाही. हीच का तुमची विश्वासार्हता, असा टोलाही त्यांनी लगावला.
भुजबळांवर पुन्हा बरसले
छगन भुजबळांचे ऐकून सरकारने निर्णय घेऊ नयेत असे बजावतानाच मनोज जरांगे यांनी आरक्षण आता अगदी टप्प्यात आले आहे. आरक्षण मिळेपर्यंत शांततेत आंदोलन करायचे. एकदा का आरक्षण मिळाले की, भुजबळांचा करेक्ट कार्यक्रम करणार असा पलटवारही यावेळी जरांगे यांनी केला. भुजबळ राज्यात जातीय तेढ निर्माण करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
आरक्षणासाठी बलिदान देणाऱयांप्रति कृतज्ञता
मराठा आरक्षणाच्या या लढय़ात अनेकांनी आपली आहुती दिली आहे. 24 डिसेंबरपर्यंतची मुदत सरकारला आहे. ठरलेल्या मुदतीत आरक्षण मिळाल्यानंतर ज्यांनी बलिदान दिले त्या प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली.
सभेला येणाऱयांसाठी अन्नछत्र
मनोज जरांगे यांच्या सभेला येणाऱया समाजबांधवांसाठी रस्त्यात ठिकठिकाणी चहा, पाणी तसेच नाश्त्याची सोय करण्यात आली होती. सभेच्या ठिकाणी खिचडी, पुरीभाजी देण्यात आली. हिंगोलीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे यांच्या पुढाकारातून बेलवाडी ग्रामस्थांनी 1 हजार लिटर केशर दुधाचे वाटप केले. सभेच्या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.