मंथन – …तरी पाऊस कसा आला?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिलीप जोशी

हवामानबदलाबाबत सातत्य असलेला आपला देश यावर्षी ‘एल निनो’च्या धास्तीने भांबावला होता परंतु जुलैच्या पहिल्या आठवडय़ात पडलेल्या पावसाने ‘एल निनो’बाबतची भाकिते खोटी ठरवली. हे गणित कसे बदलले जाणून घेऊया.

काही वेळा भाकीत चुकल्याचाही आनंद असतो. ‘विपरीत काही घडेल’ असं भाकित खोटं ठरलं तर बरंच वाटतं. तसंच काहीसं जुलैच्या पहिल्या आठवडय़ात ‘एल निनो’च्या भीतीबद्दल झालं. ‘सुपर एल निनो’ची चर्चा आणि कदाचित त्यातून, आपल्या पावसाळी देशाला दुष्काळाचा सामना कसा करावा लागेल याची भाकितं फोल ठरवत जुलैमध्ये महाराष्ट्रभर धो धो पावसाने थैमान घातलं. मग कुठे किती पूर याच्या ‘ब्रेकिंग’ बातम्या येऊ लागल्या. एवढय़ा प्रचंड पावसात ‘एल निनो’चा उग्र, उष्ण परिणाम विरून वाहून गेला की काय, असं वाटू लागलं.

आजचा विषय ‘एल निनो’ यावेळी किती फटका देईल याचा. म्हणजे पावसाळी ‘घन घन माला’ हिंदुस्थानी उपखंडाला चकवा देतील का आणि अशी स्थिती ‘एल निनो’ निर्माण करेल काय याचा विचार करणं गरजेचं. तसं, ‘एल निनो’ उष्णता वाढवतो आणि ‘ला निना’ परिणाम अधिक पाऊस आणतो, असं ढोबळमानाने म्हटलं जातं ते खरं आहे. हे दोन्ही नैसर्गिक आविष्कार पॅसिफिक महासागरातील वारे आणि पाण्याच्या कमी-अधिक तापमानाशी संबंधित आहेत. यंदा जून महिन्यापासून युरोपातील अनेक देशांनी जीवघेणा उन्हाळा अनुभवला. ज्या लोकांना वर्षानुवर्षे, जास्तीत जास्त 25 अंश सेल्सियस तापमानाचा अनुभव, तिथे एकदम पारा 40 अंशाच्या वर गेला, तर जे व्हायचं तेच झालं. हा सारा ‘एल निनो’ किंवा (सं)तापलेल्या ‘पॅसिफिक’चा परिणाम असल्याचं लक्षात आलं. वास्तविक पॅसिफिक म्हणजे ‘प्रशांत.’ परंतु ती शांतता या, पृथ्वीवरच्या सर्वात मोठय़ा महासागरात सदासर्वदा राहात नसते.

घडतं असं की, दक्षिण अमेरिकेतल्या पेरू (उच्चार परू) देशाजवळचं पॅसिफिक समुद्राचं गरम झालेलं पृष्ठभागावरचं पाणी ‘व्यापारी वारे’ ऑस्ट्रेलियाकडे ढकलतात. हे वारे पूर्व ते पश्चिम असे वाहतात. कारण पृथ्वी स्वतःभोवती पश्चिम ते पूर्व अशा गतीने फिरते. कारमधून वेगाने जाताना वाऱयाचा झोत आपल्या विरुद्ध दिशेला जातो तसंच.

पेरू देशाजवळचं गरम पाणी वाहत ऑस्ट्रेलियाकडे गेल्यावर त्या पाण्याची वाफ होऊन तिथे कमी दाबाचा पट्टा तयार होतो. असा पट्टा तयार झाला की हवा आणि बाष्प वर जाऊन ढग तयार होतात. पेरू देशाजवळ मात्र जास्त दाबाचा पट्टा तयार होऊन हवा खाली येते. ऑस्ट्रेलियातील वर गेलेलं बाष्प (वाफ) पेरूजवळ येऊन खाली येतं. या चक्राला वॉकर लूप किंवा वॉकर सेल म्हणतात.

आता हिंदुस्थानच्या बाबतीत सांगायचं तर, तिबेटच्या पठारावरची हवा तापून तिथे कमी दाबाचा पट्टा तयार होतो. त्याला वाऱयांची प्रतीक्षा असते. हे वारे उच्च दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात. त्यासाठीचा उच्च दाबाचा पट्टा मॅडॅगॅस्करजवळच्या ‘मस्करीन हाय’जवळ तयार होतो. तिथली हवा हिंदुस्थानच्या दिशेने ढगांसह प्रवास करते. ती तिबेटच्या कमी दाबाच्या पट्टय़ाकडे जाताना दोन भागांत विभागते. त्यातला एक भाग नैऋत्येकडून केरळमार्गे पश्चिम घाटात म्हणजे पर्यायाने महाराष्ट्रातही पाऊस आणतो, तर वाफेचा (ढगांचा) दुसरा भाग बंगालच्या उपसागराकडे जाऊन पूर्व घाटातील टेकडय़ा पर्वतांच्या खिंडीतून आपल्या संपूर्ण उपखंडात घुमतो आणि देशभर पाऊस पडतो.

हा आपल्या मान्सूनचा पॅटर्न लक्षात घेतला तर ‘एल निनो’ काळात काय होतं ते लक्षात येईल. पेरू देशाकडून ऑस्ट्रेलियाकडे ढकले जाणारे पाणी ‘कमजोर’ झाले तर काय होईल? तिथे कमी दाबाचा पट्टा तयार होणार नाही. ‘मस्करीन हाय’वर उच्चदाबाचा पट्टाही नसेल आणि ‘वॉकर सेल’ तयार झाला नाही तर आपल्यापर्यंत पावसाळी ढग येणारच नाहीत. हाच तो ‘एल निनो’ परिणाम. आता ‘ला निना’मध्ये ‘एल निनो’च्या उलट स्थिती होते. मस्करीनचा उच्च दाबाचा पट्टा त्यामुळे अधिक तीव्र होतो. पावसाळी ‘निम्बोक्युम्युलस’ मेघमाला नैऋत्येकडून आपल्याकडे येऊ लागतात आणि हिंदुस्थानी उपखंडात प्रचंड पाऊस पडतो.

या ‘ला निना’ आणि ‘एल निनो’चे चक्र तीन ते सात वर्षांचे असते. ‘ला  निना’चा प्रभाव दशकभर राहिला तर पावसाळा उत्तम आणि ‘एल निनो’चा परिणाम लांबला तर दुष्काळाचा कहर. यापैकी या वर्षी ‘एल निनो’ची धास्ती आहे. त्यातही संपूर्ण जून महिना कोरडा गेल्याने पीक-पाण्याचं काय होणार आणि हे ‘चक्र’ किती काळ टिकणार याची चिंता वाढणं सहाजिकच होतं. मात्र जुलैच्या प्रारंभी अचानक तुफान पाऊस सुरू झाला. म्हणजे ‘एल निनो’ निप्रभ झाला का? असा निष्कर्ष इतक्या घाईघाईने काढता येणार नाही. यावेळी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन प्रचंड मेघांचा भोवरा तयार झाला आणि त्यामुळे आपल्या देशात सर्वत्र पूरसदृश परिस्थिती निर्माण करणारा पाऊस कोसळला. ही स्थिती किती काळ टिकेल त्यावर आपल्या मोसमी पावसाचं यंदाचं भवितव्य अवलंबून असेल. काही अभ्यासकांनी म्हटलं की, ही तात्पुरती स्थिती असून 15 जुलैपासून पुन्हा पाऊस दडी मारण्याची शक्यता आहे. कारण हा स्थानिक परिणाम दिसतोय. त्याचं हेसुद्धा भाकीत खोटं ठरून पाऊस पडतच राहणार असेल तर आनंदच आहे.

याचं आणखी एक कारण म्हणजे यावेळी पॅसिफिकमधल्या ‘एल निनो’ला  टक्कर देणारी ‘इंडियन ओशन डायपोल’ किंवा ‘आयओडी’ची अनुकूल स्थिती निर्माण झालेली दिसते. आता हे इंडियन ओशन डायपोल काय आहे? तर आयओडी म्हणजे हिंदी-महासागरातील तापमानातील बदल. हे डायपोलही एल निनो-ला निना यांच्यासारखे परस्परविरोधी परिणाम करणारे असू शकतात. त्यांना आयओडी पॉझिटिव्ह, आयओडी निगेटिव्ह आणि आयओडी न्युट्रल असं म्हणतात. आयओडी निगेटिव्ह असला तर तो आपला पाऊस पळवतो. न्युट्रल असला तर साधारण पाऊस आणि पॉझिटिव्ह असला तर आपल्याकडे भरपूर पाऊस आणतो.

या प्रकारात हिंदी महासागराच्या पश्चिम भागातील म्हणजे आफ्रिकेच्या पूर्व किनाऱयावरील तापमान वाढतं. तिथली गरम हवा वाफ वर जाते ती तिथून हिंदुस्थानी उपखंडाकडे येते आणि भरपूर पाऊस देते. या वर्षी योगायोगाने अशीच स्थिती आहे. त्यामुळे निगेटिव्ह ‘एल निनो’वर ‘पॉझिटिव्ह आयओडी’चा उतारा असू शकतो. आयओडी निगेटिव्ह असताना हिंदी महासागराच्या इंडोनेशियाकडचा भाग तापेल. तिथल्या पाण्याची वाफ आपल्याकडे येणं कठीण. यावेळी इंडोनेशियन समुद्र थंड आहे. ही अनुकूल आयओडी स्थिती टिकली तर ‘एल निनो’चा विपरीत परिणाम सुसहय़ करण्याइतपत स्थिती निर्माण होऊ शकते.

या लेखात प्रत्येक ठिकाणी काय होऊ शकतं असा शक्यतांचा ‘पाढा’ एवढय़ासाठीच आहे की, निसर्गाच्या लहरीचं अचूक मोजमाप आजच्या आधुनिक विज्ञानाला पूर्णपणे गवसलेलं नाही आणि ते सापडलं तरी निसर्गचक्रात फारसा बदल करणं आपल्याला शक्य नाही. आपल्याला निसर्गाच्या बहराशी किंवा कहराशी जुळतं घेऊनच आगामी काळाचं नियोजन करावं लागेल.