निवृत्तीनंतरचा प्लॅन काय! मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव म्हणतात, आता गाणं शिकणार, भरपूर रियाज करणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

> राजेश चुरी

फायलींचा ढिगारा, सततच्या बैठकांचा सिलसिला, कधी थेट पंतप्रधानांसोबत व्हीसीद्वारे थेट संवाद, फाईलींचा निपटारा करण्यासाठी उशिरापर्यंत कार्यालयात मुक्काम, अशा व्यस्त दिनक्रमानंतर आता निवृत्तीनंतर गायनाचा आवडता छंद जोपासण्याचा आणि भरपूर रियाज करण्याचा प्लॅन मावळते मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी आखला आहे.

राज्याच्या मुख्य सचिवपदावरून मनुकुमार श्रीवास्तव रविवारी सेवानिवृत्त होत आहेत. निवृत्तीच्या पूर्वसंध्येला त्यांनी शासकीय सेवेतील आठवणींना उजाळा दिला.

मनुकुमार श्रीवास्तव यांना गायनाचा छंद आहे. शासकीय सेवेतही त्यांनी ही कला जोपासली. जाहीर कार्यक्रमात त्यांनी गाणीही सादर केली आहेत. गाणे गातानाचे त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावरही आहेत. छंदाविषयी भरभरून बोलताना ते म्हणाले, निवृत्तीनंतर गायनाचा छंद जोपासण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी गायन पंडित किंवा गुरुजींची शिकवणी लावण्याचा विचार आहे.

पंतप्रधानांसोबत ‘डिनर’
सेवेतील अविस्मरणीय अनुभव सांगताना ते म्हणाले की, देशपातळीवरील मुख्य सचिवांच्या बैठकीत राज्याचे प्रतिनिधित्व करावे लागते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांची परिषद होती. त्यानिमित्ताने त्यांच्यासोबत एकदा ‘ब्रेकफास्ट’ व एकदा ‘डिनर’ची संधी मिळाली. एकदा अशाच एका परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले कौतुक हा माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव होता.

सतत बैठकांचा सिलसिला
सर्वोच्च पदावर काम करतानाचा अनुभव सांगताना ते म्हणतात, राज्याचा मुख्य सचिव हा अनेक उच्चस्तरीय समित्यांचा अध्यक्ष असतो. आपल्या कार्यकाळात प्रमुख समित्यांच्या किमान काही बैठका घेणे अपेक्षित असते. अन्य कामेही असतात. सकाळी एखाद्या समितीची आढावा बैठक, दुपारी विविध अपॉइंटमेंटस, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठका, त्यानंतर संध्याकाळनंतर फायलींचा निपटारा असा दिनक्रम राहिला.

त्याच दिवशी फायलींचा निपटारा
राज्याचा मुख्य सचिव म्हणून बारा-बारा तास काम केलं. आलेल्या फाईलींचा त्याच दिवशी निपटारा केला. परिणामी माझ्याकडे कोणत्याच फाईल्स अनावश्यकरीत्या प्रलंबित राहिल्या नाहीत. माझ्या कामाची पद्धत वेगळी आहे असे ते सांगतात.

कामाची पद्धत तीच राहील
निवृत्तीनंतर सरकारने त्यांच्यावर राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्तपदाची जबाबदारी सोपवली त्यावर भाष्य करताना ते म्हणाले की, मुख्य सचिवपदाच्या तुलनेत या कामाची जबाबदारी कमी असेल, पण माझ्या कामाची पद्धत तशीच राहील.