
‘26/11’च्या दहशतवादी हल्ल्याला 15 वर्षे लोटली. या कालावधीत मुंबईची सागरी सुरक्षा सक्षम व तगडी झाली का असा प्रश्न एपंदरीत सुरक्षा व्यवस्था पाहता निर्माण झाला आहे. कारण पोलिसांकडे सक्षम व आधुनिक सागरी गस्त नौका नाहीत, स्वतंत्र जेटी नाही, संवेदनशील असलेल्या आठ लॅडिंग पॉइंटवर चोवीस तास बंदोबस्त नसतो, सागरी पोलीस ठाण्यांच्या आवश्यक ठिकाणी बीट चौक्या नाहीत, इन्फ्रारेड ड्रोन नाहीत, गस्तीसाठी नेमणुकीला असलेले अंमलदार हे पन्नाशीतले आहेत, अशा एक ना अनेक समस्यांमुळे सागरी सुरक्षा कशी होणार असे अधिकारी, कर्मचारी सांगतात.
दहशतवादी हल्ल्यानंतर समुद्रामार्गे घुसखोरी होऊ म्हणून सागरी गस्तीसाठी 23 बोटी मुंबई पोलिसांच्या ताफ्यात दाखल झाल्या. त्या बोटीतून मुंबई पोलिसांनी सागरी गस्तीला दणक्यात सुरुवातसुद्धा केली. पण दिवस सरकू लागले तसे बोटींच्या देखभालीचा विषय गंभीर होऊ लागला. परिणामी ‘26/11’ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू केलेली सागरी नौका गस्त आता मरगळलेल्या अवस्थेत असल्याचे चित्र आहे. या 23 बोटींचे आयुष्य संपलेले असून रनिंग अवर्सदेखील पूर्ण झाले आहे. त्यातील 13 बोटी या धूळ खात पडल्यात तर आठ बोटी सुरू आहेत. त्यातली ‘मुंबई-2’ ही बोट वगळता उर्वरित बोटी धापा टाकत गस्त घालत आहेत.
– यलोगेट, सागरी-1 आणि सागरी-2 या पोलीस ठाण्यांकडे पुरेसे मुनष्यबळ उपलब्ध नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. तरुण अंमलदार सागरी पोलीस ठाण्यांमध्ये असणे गरजेचे असल्याचे वयोवृद्ध अंमलदार सांगतात.
– सागरी-1 पोलीस ठाणेअंतर्गत गीता नगर तसेच सागरी-2 पोलीस ठाण्याच्या अंतर्गत जुहू-कोळीवाडा व मढ तळपसा या ठिकाणी आवश्यक तशा बीट चौक्या नसल्याने पोलिसांची पंचाईत होत आहे.
– मुंबई शहरात 109 लॅडिंग पॉइंट असून त्यापैकी आठ लँडिंग पॉइंट हे संवेदनशील आहेत. पण या आठ ठिकाणी 24 तास सुरक्षा रक्षकांचा बंदोबस्त नसतो. स्थानिक पोलीस त्यांच्या परीने काम करतात.
– बोटींना स्पीड नसल्यामुळे कमी अंतरावर जाण्यासाठी खूप वेळ लागतो. शिवाय इन्फ्रारेड दुर्बीण, लाईफ जॅकेट, रिंगबॉय, रिफ्लेक्टर जॅकेट यासारख्या सरंजामाची कमरता असल्याचे पोलीस सांगतात.
बोटी थंडावल्या, इन्फ्रारेड ड्रोन तरी येणार का?
सागरी सुरक्षेचे महत्त्व लक्षात घेता तितक्या ताकदीने सुरक्षा होत नसल्याचे चित्र आहे. नादुरुस्तीमुळे बोटी तर थंडावल्यात. पण आधुनिक युगात अधिक उत्तम तंत्रज्ञानाच्या जोरावर सागरी भागांवर करडी नजर ठेवता येऊ शकेल. त्यासाठी पाच नॉटिकल मैलापर्यंत निरीक्षण करू शकेल असे इन्फ्रारेड ड्रोन अद्याप मुंबई पोलिसांकडे नसल्याची गंभीर बाब आहे. किमान इन्फ्रारेड ड्रोन जरी वापरात आले तरी सागरी सुरक्षा ताकदीने करता येऊ शकेल. पण हे ड्रोन कार्यालयीन प्रक्रियेत फिरत असल्याने ते कधी उपलब्ध होणार हाच आमच्यापुढे पडलेला प्रश्न असल्याचे अधिकारी, कर्मचारी सांगतात.



























































