विद्यार्थ्यांपाठोपाठ गुरुजीही दांडीबहाद्दर; माध्यमिक शाळेतील 465 तर प्राथमिक शाळेतील 77 गुरुजींची दांडी

एसटी बसची सुविधा नसल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थी अनुपस्थित राहत आहेत. त्यामुळे एसटी विभागासोबत एक बैठक घेत शाळांच्या वेळा पाहून एसटी वाहतूक सुरु करावी अशी मागणी रत्नागिरी तालुका गटशिक्षणाधिकारी सुनिल पाटील यांनी रत्नागिरी पंचायत समितीच्या मासिक सभेत केली.

विद्यार्थ्याची 50 टक्क्यांपेक्षा कमी उपस्थिती असताना शिक्षकांनीही दांडी मारण्याचे सत्र सुरु केले आहे. माध्यमिक शाळांतील तब्बल 465 शिक्षक अनुपस्थित आहेत. तर प्राथमिक शाळांतील 77 शिक्षक अनुपस्थित राहात असल्याबाबतची माहिती बुधवारच्या मासिक सभेत पुढे आली. रत्नागिरी पंचायत समितीची मासिक सभा सभापती संजना माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी व्यासपीठावर उपसभापती उत्तम सावंत, गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी विजय पोकळे उपस्थित होते.

रत्नागिरी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सुनिल पाटील यांनी शाळा सुरु झाल्यापासूनचा आढावा सभागृहात वाचून दाखवला. माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीचे प्रमाण अधिक आहे. इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या 54 माध्यमिक शाळांपैकी 49 माध्यमिक शाळा सुरु झाल्या असून एकूण 19 हजार 367 विद्यार्थ्यांपैकी 7 हजार 625 विद्यार्थी उपस्थित आहेत. आठवी ते बारावीच्या शहरी भागातील 42 शाळांपैकी 40 शाळा सुरू झाल्या आहेत. त्या शाळांमधील 19 हजार 525 विद्यार्थ्यापैकी 6 हजार 250 विद्यार्थी उपस्थित राहात आहेत. अनेक विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी एसटी बसची सेवा नसल्यामुळे हे विद्यार्थी शाळेत येत नाहीत. प्राथमिक 162 शाळांपैकी 155 शाळा सुरु झाल्या आहेत. या शाळेतील 8 हजार 062 विद्याथ्यापैकी 3 हजार 450 विद्यार्थी उपस्थित राहतात अशी माहिती शिक्षणाधिकारी पाटील यांनी दिली.

शिक्षकांचीही दांडी
4 ऑक्टोबरला शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांची उपस्थिती 50 टक्क्यांपेक्षा कमी आहे. विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनीही शाळेला दांडी मारण्याचे सत्र सुरू केले आहे. प्राथमिक शाळेतील 531 शिक्षकांपैकी 454 शिक्षक उपस्थित आहेत. माध्यमिक शाळेतील 1 हजार 301 शिक्षकांपैकी केवळ 836 शिक्षक उपस्थित आहेत. शिक्षकांच्या अनुपस्थितीबाबत सभागृहात नाराजी व्यक्त करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या