
सामना प्रतिनिधी । जामखेड
शासनाच्या नोकर भरतीसाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर दाखले काढून या आरक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सकल मराठा समाजाचे समन्वयक मंगेश आजबे यांनी केले.
जामखेड तालुक्यात प्रथम आरती कुमटकर या विद्यार्थीनीला तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या हस्ते वितरीत करून दाखले वाटपाची सुरुवात केली. यावेळी मंगेश आजबे, महादेव डुचे, शरद कार्ले, सोमनाथ पोकळे, सोमनाथ तनपुरे, अनिल रोडे, आण्णा मांजरे, किसन वराट, केशव कोल्हे, काका कुमटकर, चंद्रकांत कार्ले, गणेश नेटके, संतोष भोंडवे, दादासाहेब मोहिते, कांतिलाल वाळूंजकर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आजबे म्हणाले की, शासनाने मेगा भरती सुरू केली आहे. यासाठी मराठा समाजाला जातीच्या दाखल्याची आवश्यकता भासू लागली आहे. या पार्श्वभूमीवर दाखले वाटप करण्यात आले. मागास मराठा समाज्याच्या प्रगतीसाठी हे आरक्षण आहे. विद्यार्थ्यांना व बेरोजगार तरुणांना याचा फायदा होणार आहे.
तालुका अध्यक्ष महादेव डुचे म्हणाले की, मराठा समाजातील विद्यार्थांनी तालुक्यातील कोणत्याही महाईसेवा केंदात जाऊन दाखले काढावेत यासाठी स्वतःचा शाळा सोडल्याचा दाखला, वंशावळ, स्व घोषणा पत्र, १९६७ चा पुरावा, रहिवास महसुली पुरावे आणावेत व लवकरात लवकर दाखले काढून घ्यावेत.
तहसीलदार विशाल नाईकवाडे म्हणाले की, नोकर भरती व शैक्षणिक क्षेत्रात फायदा घेण्यासाठी मराठा समाजातील विद्यार्थांनी दाखले काढावेत. यासाठी प्रशासन पूर्णपणे सहकार्य करेल.
































































