सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत काय? ठाण्यातून मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण राज्यात शांततेमध्ये आंदोलने सुरू आहेत. पण सत्तेतील काही महाभाग स्वतःच्या स्वार्थासाठी समाजामध्ये भांडणे लावण्याचे काम करीत आहेत. जातीय तेढ निर्माण व्हावे यासाठी वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यांना मुख्यमंत्री आवर का घालत नाहीत? सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत काय, असा थेट सवाल मनोज जरांगे-पाटील यांनी आज ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला. मराठा आंदोलनकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे दोन दिवसात मागे घ्या, असा अल्टिमेटमही जरांगे यांनी दिला.

महाराष्ट्रव्यापी दौऱ्यावर असलेले मनोज जरांगे-पाटील हे आज ठाण्यात आले होते. त्यांचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले. तसेच शहरातून मोठी रॅली काढली. ठिकठिकाणी त्यांच्यावर जेसीबीमधून पुष्पवृष्टी केली. त्यांच्या स्वागताकरिता ठाण्यात प्रचंड गर्दी झाली होती. गडकरी रंगायतन येथे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मनोज जरांगे-पाटील यांनी आपल्या सरकारवर टीकेची झोड उठवली. सत्तेत बसून वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी वेळीच आवरावे, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशाराही त्यांनी दिला. बोईसर व मीरा रोड येथेही झालेल्या सभेत जरांगे यांनी आरक्षण मिळवणारच याची ग्वाही  भाषणात दिली.

आंतरवालीला पोहोचण्याच्या आधी टाईमबॉण्ड द्या

टाइमबॉण्ड देण्यासाठी येणारे विमान सात दिवस झाले तयार आहे, पण त्यामध्ये बसायला कोणताही नेता तयार नाही. सरकारला आपली भाषा कळत नसल्याचेही ते म्हणाले. राज्यातील दौरे पूर्ण करून मी गावी जाणार आहे. त्यामुळे आंतरवालीला पोहचण्याच्या आधी आरक्षणसंदर्भातील टाइमबॉण्ड माझ्या हातात द्या, अशी मागणी मनोज जरांगे-पाटील यांनी केली आहे.

हे आंदोलन सेटलमेंटसाठी नाही

मराठा समाजाला आरक्षणाला मिळावे यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करीत असून हे आंदोलन सरकारशी सेटलमेंट करण्यासाठी नाही. येत्या अधिवेशनात सरकारने कायदा करून मराठय़ांना आरक्षण द्यावे अशी मागणी करत माझा जीव गेला तरी मागे हटणार नाही, अशी ग्वाही मनोज जरांगे यांनी उपस्थित मराठा समाजाला दिली.

ओबीसींचे आरक्षण कमी न करता मराठा आरक्षण देऊ – मुख्यमंत्री

इतर कोणत्याही समाजाचे तसेच ओबीसींचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी या सरकारची आहे. यावर युद्धपातळीवर काम सुरू असून न्यायालयात टिकणारे आरक्षण मराठा समाजाला देणार असल्याची माहिती आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरात पत्रकारांशी बोलताना दिली.

तुमच्या क्लिपा बाहेर येत आहेत, जरा दमानं…

मराठय़ांचा राजकारणासाठी फक्त वापर करून घेतला. मात्र आता आरक्षणाच्या निमित्ताने मराठ्यांची सुनामी आली असून ती कोणीच रोखू शकणार नाही, असे जरांगे यांनी सांगितले. ते म्हणाले, आमच्यावर टीका करणाऱ्यांच्या क्लिपा बाहेर येत आहेत. त्यामुळे जरा दमानं..

उपमुख्यमंत्र्यांची नावं तरी किती लक्षात ठेवायची?

जरांगे यांनी उपमुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली. एक उपमुख्यमंत्री मागे म्हणाले होते की, जरांगे आमचं नावसुद्धा घेत नाहीत. अहो, त्यांचे पाच-पाच उपमुख्यमंत्री होतात. नावं तरी किती लोकांची लक्षात ठेवायची? असे जरांगे यांनी सांगताच सभागृहात हास्याची लकेर उमटली.