भाजपच्या आमदाराला मराठा तरुणांनी हाकलले

मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावात पाय ठेवायचा नाही, असा सज्जड दम देत मराठा कार्यकर्त्यांनी आज भाजपचे आमदार नारायण कुचे यांना गावात प्रवेश करण्यास मज्जाव करत अक्षरशः हाकलून लावले.

अंबड तालुक्यातील शिराढोण गावात आमदार कुचे काही कार्यक्रमानिमित्त आले होते. त्याची कुणकुण लागताच मराठा तरुणांचा जमाव तिथे जमला आणि त्यांनी कुचे यांना गावात प्रवेश करण्यास मज्जाव केला. यावेळी कुचे समर्थक आणि मराठा तरुणांमध्ये बाचाबाचीही झाली. मराठा तरुणांनी जोरदार घोषणाबाजी सुरू करताच कुचे यांनी तिथून काढता पाय घेतला. अंबड तालुक्यात झालेल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यानंतर मराठा आंदोलकांनी लावलेले गावबंदीचे बॅनर फाडण्याचे प्रकार घडले. त्यामुळे मराठा आंदोलक अधिक आक्रमक झाले आहेत.