मराठा क्रांती मोर्चाचा काँग्रेसला इशारा; जातीयवादी धोरण सोडा नाहीतर मराठा समाजाची मतं विसरा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पदोन्नतीतील आरक्षणावरून काँग्रेसने 7 मे रोजी पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. या मागणीवर संतप्त झालेल्या मराठा क्रांती मोर्चाने काँग्रेसला इशारा दिला आहे. काँग्रेसने जातीयवादी भूमिका सोडावी अन्यथा काँग्रेसला फक्त मागासवर्गीय समाजाने मतदान करावे व मराठा समाजाने मतदान करू नये असे जाहीर करावे, अशा शब्दांत मराठा क्रांती मोर्चाने आपला संताप व्यक्त केला आहे.

मराठा समाजाकडून काँग्रेसने पदोन्नतीतील आरक्षणाचा शासन निर्णय रद्द करण्याबाबत घेतलेल्या भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाची भूमिका जाहीर केली आहे. या पक्षाने भूमिका घेताना हेही लक्षात घ्यावे की फक्त मराठा समाजच नाही तर पदोन्नतीतील आरक्षणाचा लाभ नसलेल्या इतर मागास जातींवरसुद्धा वर्षानुवर्षे अन्याय झाला आहे व काँग्रेस पक्ष आजही अशा अन्यायाचे समर्थन करत आहे, अशी नाराजी मराठा मोर्चा समन्वयक विरेंद्र पवार यांच्यासह अन्य समन्वयकांनी काढलेल्या पत्रकात व्यक्त करण्यात आली आहे.

काँग्रेस मंत्र्यांच्या भूमिकांबाबत नाराजी

मराठा क्रांती मोर्चाकडून मंत्री विजय वडेट्टीवार, वर्षा गायकावड तसेच नितीन राऊत यांच्या भूमिकांबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजासाठी काम करणारी ‘सारथी’ ही संस्था भ्रष्टचाराच्या आरोपाखाली बदनाम केली. पण भ्रष्टाचाराचा एकही पुरावा सापडला नाही. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सर्वोच्च न्यायालयाची मराठा आरक्षण स्थगितीची ऑर्डर अपलोड होण्याआधीच  11 वीच्या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती दिली. त्याने हजारो मराठा मुले प्रवेशापासून वंचित राहिली होती. नितीन राऊत यांची भूमिका तर आता जाहीरच आहे. त्यांनी महावितरण अंतर्गत नियुक्त्या दिलेल्या मराठा मुलांना आजही ताटकळत ठेवले आहे. मराठा समाजाबद्दल एवढा द्वेष जर काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये असेल तर मराठा समाज येणाऱया निवडणुकीत या पक्षाला योग्य ती जागा दाखवेल, असा इशारा मराठा मोर्चाकडून देण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांना भेटणार

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही आपली भूमिका आहे, मात्र सध्या ही प्रक्रिया थांबली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार यांची आपण उद्या भेट घेणार आहोत, अशी माहिती खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज बुधवारी दिली. या भेटीनंतर आपण आपली पुढील भूमिका येत्या शुक्रवार, 28 मे रोजी जाहीर करणार आहोत, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेनंतर भूमिका – नाना पटोले

पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा शासन निर्णय काढताना आम्हाला विचारलं गेलेलं नाही. म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना वेळ मागितलेली आहे. त्यांच्या भेटीनंतर याबाबत तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यासोबंत बैठक झाल्यानंतर व सगळ्यांच्या समक्ष सविस्तर चर्चा झाल्यानंतर आम्ही भूमिका स्पष्ट करू. असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सांगितले.

जातींमध्ये वाद झाल्यास काँग्रेस जबाबदार

काँग्रेसने कायमस्वरूपी जातीयवादी भूमिका घेऊन राज्याचे सामाजिक स्वास्थ्य खराब करावे. यामुळे यापुढे राज्यात जाती जातींमध्ये वाद निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही काँग्रेस पक्षाची राहील, असे सांगताना जातीय मतभेदांसाठी मराठा क्रांती मोर्चाकडून सर्वस्वी काँग्रेसला जबाबदार धरण्यात आले आहे.