मराठा आंदोलनाचा भडका, सरकार झोपलेलेच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

आरक्षण देण्यास सरकारकडून चालढकल होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बेजबाबदार विधाने करून मराठा समाजाच्या संतापात भरच घातली. बुधवारी मुंबई-ठाण्यासह राज्यभरात ठिकठिकाणी जोरदार आंदोलन झाले, कडकडीत बंद पाळण्यात आला. अनेक ठिकाणी रास्ता रोको, मोर्चे काढत घोषणाबाजी केली गेली. मुंबईतील काही तुरळक घटना वगळता ठाणे-नवी मुंबईत मात्र दगडफेक, जाळपोळीसारख्या हिंसक घटना घडल्या. एसटी बसेस आणि पोलिसांच्या वाहनांना लक्ष्य केले गेले. त्यात अनेक पोलीस जखमी झाले. दुपारी पावणेतीन वाजता बंद स्थगित केल्याची घोषणा मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली, मात्र त्यानंतरही ठाणे, कळंबोलीत हिंसक आंदोलन सुरूच होते.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संभाजीनगर येथे सोमवारी पुकारण्यात आलेल्या जलसमाधी आंदोलनात काकासाहेब शिंदे या आंदोलकाचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाला होता. त्या घटनेबद्दल सरकारचा निषेध करण्यासाठी तसेच राज्य सरकार करत असलेल्या मेगा भरतीमध्ये मराठय़ांना आरक्षण देण्याचे लेखी आश्वासन द्यावे या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. त्यानंतर आज मुंबई व आसपासच्या जिह्यांमध्ये बंद पुकारण्यात आला होता.

मुंबईत सकाळपासूनच दुकाने बंद होती. दादरच्या प्लाझा सिनेमाजवळ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सरकारविरोधी निदर्शने केली गेली. मुलुंड येथे आंदोलकांनी गाडय़ांचे टायर जाळून रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला. मानखुर्दजवळ आंदोलकांनी बेस्टच्या बसची तोडफोड करून ती पेटवली. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून ती आग आटोक्यात आणली. बंददरम्यान अनुचित घटना घडू नयेत म्हणून नाक्यानाक्यांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सकाळी पावणेदहाच्या सुमारास परळ-शिवडी भागात मराठा आंदोलकांनी रस्त्यावर उतरून दुकाने बंद केली. सरकारविरोधी घोषणा देत त्यांनी परळ गावातून मोर्चा काढला. लालबागमध्ये आंदोलकांच्या घोषणाबाजीनंतर लालबाग मार्केटमधील सर्व दुकाने बंद झाली. दादर पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या मांडला तसेच हिंदमाता परिसरातील दुकाने बंद केली. वरळी येथे मुंडन करून मराठा आंदोलकांनी सरकारचे श्राध्द घातले. घाटकोपरच्या भटवाडीत आंदोलकांनी बसेसची वाहतूक बंद पाडली. वांद्रय़ातही मराठा आंदोलकांनी दुकानदारांना दुकाने बंद करण्याचे शांततेत आवाहन केले.

सरकारनेच हातात दगड दिला
सकल मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समन्वयक वीरेंद्र पवार यांनी दुपारी पावणेतीन वाजता पत्रकार परिषद घेऊन बंद स्थगित केल्याची घोषणा केली. तसेच ठाणे आणि नवी मुंबईतील बंदही स्थगित करण्याचे आवाहन केले. सरकारने फसवणूक केल्यामुळेच बंद पुकारावा लागल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारमुळेच मराठा समाजाला हातात दगड, काठय़ा घ्याव्या लागल्या. त्याचा काहींना त्रास झाला. त्यांची आम्ही क्षमा मागतो. पण सरकारने याची दखल घ्यावी असे सांगतानाच राजकीय हेतूने बंद पेटवला गेल्याचा संशयही मराठा क्रांती मोर्चाने व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली
सकाळपासून मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला सुरुवात झाली. राज्याच्या विविध भागांमध्ये संतप्त आंदोलकांकडून हिंसाचाराच्या घटना घडल्या. रस्ते रोखले गेले, महामार्गांवर ठिय्या मांडला. एसटी बसेस फोडण्याचे, पोलिसांची वाहने जाळण्याचे प्रकार घडले. दगडफेकीत अनेक पोलीस जखमी झाले. दिवसभर या सर्व घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायंकाळी परिस्थिती नियंत्रणात आणली. सकल मराठा समाजाशी आपण चर्चेस तयार आहोत. सरकार आरक्षण देण्यास कटिबद्ध आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

‘मुंबई बंद’चा एस. टी.ला आर्थिक फटका
मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या मुंबई बंदमध्ये एस. टी. सेवेला फटका बसला आहे. एस. टी.च्या मुंबईतील पाच डेपोंपैकी चार डेपो संपूर्ण बंद ठेवण्यात आल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागले. मुंबईतून एस. टी.च्या दररोज ४१४ फेऱया चालविण्यात येतात, परंतु बुधवारच्या मुंबई बंद आंदोलनामुळे २७२ फेऱ्याच प्रत्यक्षात चालविण्यात आल्या. मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला आणि पनवेल डेपो संपूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते तर उरण डेपोची वाहतूक काही प्रमाणात सुरू होती.

आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही; चंद्रकांत पाटलांविरुद्ध संताप
मराठा आरक्षण देण्याची मानसिकताच या सरकारची नाही. त्यामुळेच तर या आंदोलनात पेड लोक घुसल्याचा आरोप करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आता काहीही होवो मराठा समाज मागे हटणार नाही. आरक्षण घेतल्याशिवाय गप्प राहणार नाही, असा निर्धारच आज सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला. मराठा आरक्षणासाठी आता ठोक मोर्चालाच सुरुवात करणाऱया सकल मराठा समाजाने कालपासून आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. ऐतिहासिक दसरा चौक येथील आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने आज दुसऱयाही दिवशी बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले.

पश्चिम महाराष्ट्रात दुसऱया दिवशीही पडसाद
आरक्षणासाठी सकल मराठा समाजाने पुकारलेल्या आंदोलनाचे पडसाद पश्चिम महाराष्ट्रातील नगर, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिह्यांमध्ये आज दुसऱया दिवशीही उमटले. सातारा येथील पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात आंदोलनाला गालबोट लागले. शेकडोंच्या संतप्त जमावाने केलेल्या तुफान दगडफेकीत जिल्हा पोलीस प्रमुखांसह डझनभर पोलीस जखमी झाले आहेत. दरम्यान, प्रक्षुब्ध झालेल्या जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला; तसेच लाठीचार्ज करीत अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या. कराडमध्ये एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. नगर शहरातील नऊ महामार्गांवर चक्का जाम आंदोलन करण्यात आल्यामुळे महामार्गावरील वाहतूक सर्वत्र ठप्प झाली होती. शहरामध्ये १०० टक्के कडकडीत बंद पाळण्यात आला. आंदोलकांनी भाजप खासदार दिलीप गांधी यांच्या घरावर हल्लाबोल केला. दुसरीकडे कर्जत तालुक्यात वन विभागाची गाडी आंदोलनकर्त्यांनी पेटवून दिली. कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक येथील आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने आज दुसऱया दिवशीसुद्धा बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा समाजाची दिशाभूल आणि फसवणूक करणाऱया भाजप सरकारवर कडाडून हल्लाबोल करण्यात आला. जिह्यातील शिरोळ, गडहिंग्लज तालुक्यांसह जयसिंगपूर, हुपरीतही कडकडीत बंद पाळण्यात आला. सांगलीत आंदोलकांनी कृष्णा नदीत प्रतीकात्मक जलसमाधी आंदोलन केले, तर सोलापुरात ३० जुलै रोजी बंदची हाक देण्यात आली आहे.

आंदोलनकर्त्यांकडून बेस्टच्या बसगाडय़ा टार्गेट
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज पुकारण्यात आलेल्या बंददरम्यान आंदोलनकर्त्यांनी बेस्टच्या बसगाडय़ांना टार्गेट केले. पहाटे सवापाच वाजता बेस्टच्या कामगारांना घेऊन जाणारी बस आंदोलनकर्त्यांनी फोडली. त्यानंतर दिवसभरात आंदोलनकर्त्यांनी दोन बसगाडय़ा जाळल्या तर तब्बल २५ गाडय़ांचे दगडफेकीत नुकसान केले. काही गाडय़ांची हवा काढली, तर अनेक गाडय़ांचे टायर जाळले. शिवाजीनगर आगाराची कर्मचाऱयांना घेऊन जाणारी बस डीमार्ट कोपरखैरणे येथे आली असता काही अज्ञात व्यक्तींनी बसच्या पुढील काचा व बाजूच्या चार काचा फोडल्या. अज्ञात इसमांनी बसच्या आसनांना आग लावण्याचा प्रयत्न केला. मात्र बस वाहकाने वेळीच प्रसंगावधान दाखवून तत्काळ आग विझवली.

मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध – मुख्यमंत्री
मराठा समाजाचे आंदोलन उग्र होत असताना मुख्यमंत्र्यांनी एक पाऊल मागे घ्यावे असे अवाहन मराठा समाजाच्या नेत्यांकडून करण्यात येत होते, मात्र दोन दिवस कोणताही प्रतिसाद दिला गेला नाही. आज दुपारनंतर मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात निवेदन केले. गेल्या काही दिकसांपासून होणारी आंदोलने, आत्महत्या किंका आत्महत्येचे प्रयत्न या सर्क बाबी अतिशय दुःखदायी आहेत. राज्य सरकारचे असे स्पष्ट मत आहे की, या योजनांसंदर्भात किंका इतर बाबींमध्ये कोणत्याही त्रुटी आढळून येत असतील तर त्या चर्चेच्या माध्यमातून दूर करण्याची राज्य सरकारची तयारी आहे. मेगाभरतीच्या संदर्भात जो संभ्रम सकल मराठा समाजाच्या मनात निर्माण झाला आहे त्याही बाबतीत चर्चा करून सर्कमान्य असा उचित निर्णय घेणे शक्य आहे. त्यामुळे हिंसा किंका आंदोलनाचा अकलंब न करता शासनाशी चर्चा कराकी, असे आकाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

मराठा व दलित संघर्ष पेटवण्याचा भाजपचा प्रयत्न – अशोक चव्हाण
महाराष्ट्रात मराठा समाज व इतर समाज असे ध्रुवीकरण करून जातीमध्ये संघर्ष पेटवण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न सुरू आहे. भीमा-कोरेगाव दंगल घडवून मराठा विरुद्ध दलित असा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मराठा आंदोलन चिघळवून राजकीय फायदा करून घेण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला. मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

मुंबई-पुणे एक्प्रेस वे रोखून धरला
मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर मुंबईच्या दिशेने अनेक ठिकाणी आंदोलकांनी रस्ता अडवून धरला होता. दुपारी 3 वाजल्यापासून आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत एसटी बसेस आणि मालवाहतूक करणारी वाहने फोडली. त्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी एसटी बसेस रिकाम्या केल्या. कळंबोलीपासून ते खालापूरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. काही ठिकाणी पोलिसांचा सशस्त्र्ा फौजफाटा आल्यानंतर आंदोलकांची पळापळ झाली. रस्त्याच्या मधोमध भलेमोठे कंटनेर लावून आंदोलकांनी एक्प्रेस वे अडवून धरला होता, अशी माहिती एक्प्रेस वेवर अडकून पडलेले प्रवासी नागेश सरोदे यांनी दिली.

मराठा आरक्षणासाठी दोन आमदारांचे राजीनामे
संभाजीनगर – राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याच्या निषेधार्थ कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव व वैजापूरचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी आमदारकीचे राजीनामे दिले. हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे ईमेलने आपला राजीनामा पाठवला आहे. वैजापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब पाटील यांनीही मराठा आरक्षण न मिळाल्यामुळे तसेच काकासाहेब शिंदे यांच्या जलसमाधीमुळे व्यथित होऊन आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.