मराठा आरक्षणासाठी दोन महिन्यांत 19 आंदोलकांनी मृत्यूला कवटाळले; बहुतांश तरुण वयाच्या तिशीच्या आतील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>राजेश चुरी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या दोन-तीन महिन्यांत राज्यात सुरू असलेल्या आंदोलनात आतापर्यंत तब्बल 19 जणांनी आत्महत्या केल्याची अधिकृत सरकारी आकडेवारी पुढे आली आहे. त्यातील बहुसंख्य आंदोलक वयाच्या तिशीच्या आतील आहेत. यामध्ये एका 17 वर्षांच्या तरुणीचाही समावेश आहे.

आंतरवाली सराटी येथे 29 ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले. त्यानंतर जालन्यात झालेल्या लाठीमारानंतर राज्यात मराठा आरक्षण आंदोलन तीव्र झाले. विविध ठिकाणी आंदोलने झाली, रास्ता रोको झाला. राजकीय नेत्यांच्या वाहनांच्या काचा पह्डल्या, आगी लावल्या. मराठा तरुण आक्रमक होऊन रस्त्यावर उतरला होता, पण दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी 19 जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

आत्महत्यांच्या या दुर्दैवी सत्राची सुरुवात 19 ऑक्टोबरला मुंबईत वांद्रे येथून झाली. सुनील बाबुराव कावळे (45) यांनी वांद्रे येथील फ्लायओव्हरवर गळफास घेतला. त्यानंतर एकामागून एक आत्महत्यांचे सत्र सुरू झाले. यामध्ये आरती नागोराव शिंदे या 17 वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. ऑक्टोबर महिन्यात 17 जणांनी मराठा आरक्षणासाठी जीवन संपवले. यासंदर्भातील पोलिसांनी नोंदवलेल्या अभिप्रायात आरक्षणासाठी आत्महत्या केल्याच्या घटनेत ‘तथ्य दिसून येत आहे’ किंवा ‘चिठ्ठी आहे’ असे नमूद केले आहे.

मध्यंतरी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आंदोलनात सुमारे 12 कोटी रुपयांचे सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाल्याची माहिती दिली होती, पण या आंदोलनात किती जणांनी जीवन संपवले त्याचा तपशील दिला नव्हता, मात्र राज्य सरकारकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार 19 जणांनी मराठा आरक्षणासाठी स्वतःचे जीवन संपवले आहे.