Maratha Reservation – बीडमध्ये सरकारचा प्रतिकात्मक दशक्रियाविधी, 288 जणांचे सामूहिक मुंडन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांचे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे गेल्या 12 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. मात्र मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार ठोस भूमिका घेत नसल्याने बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील निमगाव शोभा येथे मराठा तरुणांनी आक्रमक होत आंदोलन केले. यावेळी 288 तरुणांनी सामूहिक मुंडन करत सरकारचा प्रतिकात्मक दशक्रियाविधी केला.

मराठा आरक्षणाचा मुद्दा अनेक वर्षांपासून गाजत आहे. मध्यंतरी मराठा समाजाने महाराष्ट्रात मूक मोर्चेही काढले. मात्र सरकारने कायमस्वरुपी टिकेल असे आरक्षण दिले नाही. त्यामुळे मराठा समाज संतप्त झाला असून याच मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील उपोषणाला बसले आहेत.

शांततेत सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्याने हे आंदोलन चिघळले. यानंतर राज्यभरातील मराठा समाज संतप्त झाला असून सरकारवर रोष व्यक्त करत आहे. दरम्यान, जरांगे -पाटील यांचे शिष्टमंडळ आणि सरकारमध्ये शुक्रवारी रात्री अडीच तास चर्चा झाली. सरकार एक महिन्याचा वेळ मागण्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, मराठा समाजाच्या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर निमगाव चोभा येथील तरुणही रस्त्यावर उतरले असून सरकारचा प्रतिकात्मक दशक्रियाविधी करून सामूहिक मुंडन केले. तसेच काही तरुण उपोषणालाही बसले आहेत.