
सामना ऑनलाईन,जुन्नर
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी झालेल्या आंदोलनातील आंदोलकांवरील 80 टक्के खटले मागे घेण्यात आले आहेत. उर्वरित आंदोलकांवरील खटलेदेखील पूर्णपणे मागे घेण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर शिवजयंती उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. शिवरायांना अभिवादन करण्यासाठी हजारो शिवभक्तांनी शिवनेरीवर हजेरी लावली होती. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात आला आहे. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे जगातील सर्वात मोठे स्मारक उभारण्यात येत आहे. किल्ले रायगडाला जतन करण्याचे काम सुरू आहे. इतर गडकिल्ल्यांचे संवर्धन सुरू आहे. या भागात पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार शरद सोनावणे आदी उपस्थित होते.



























































