
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात उपोषणाला बसले असून त्यांच्यासह मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांनी 4 वाजेपर्यंत रस्ते मोकळे करावेत असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. या संदर्भातील नोटीसही मुंबई पोलिसांनी जरांगे-पाटील यांना दिली आहे. कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मराठा आंदोलकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली.
मराठा आंदोलक आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आलेले असून सीएसएमटी स्थानकामध्ये काही आंदोलकांना ठिय्या मांडला होता. लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात तिथे आणि उपनगरीय लोकल सुटतात त्या भागामध्ये आंदोलक बसलेले होते. त्यांना उठवण्यात येत असून पोलीस, जीआरपी, आरपीएफ एमएसएफकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलीस आंदोलकांची समजूत काढत असून कोर्टाचा आदेश दाखवत त्यांना घरी जाण्याची किंवा वाशीतील सिडको एक्झीबीशन सेंटर येथे जाण्यास सांगत आहेत.
मुंबई पोलिसांकडून मनोज जरांगेंना आझाद मैदान लवकरात लवकर रिकामे करण्याची नोटीस
कोर्टाच्या आदेशाचे मान राखणे आपले काम आहे, असे म्हणत पोलीस आणि जवान आंदोलकांना सीएसएमटी स्थानकातून बाहेर काढत आहेत. यामुळे हळूहळू रेल्वे स्थानक रिकामे होताना दिसत आहे.
याबाबत पोलिसांनी बोलताना सांगितले की, न्यायायलयाच्या आदेशानुसार सर्व स्थानक रिकामे करण्याचे काम सुरू केले आहे. पोलीस लोकांना आवाहन करत आहेत. स्पिकरद्वारे उद्घोषणा सुरू आहेत. आंदोलक प्रतिसाद देत असून रेल्वे स्थानक रिकामे करत आहेत. जे आंदोलक ऐकत नाही त्यांना कायद्याने हाताळत आहोत, अशी माहिती पोलिसांनी माध्यमांशी बोलताना दिली.