
आझाद मैदानात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या आंदोलनात देशभरातून लाखो आंदोलक सहभागी होणार आहेत. त्यापैकी बहुतेक आंदोलक गुरुवारी नवी मुंबईत मुक्कामी आले. या आंदोलकांना पायाभूत सुविधा पुरवण्यास नवी मुंबई महापालिका प्रशासनाने नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी नवी मुंबई महापालिका मुख्यालयात पालिका आयुक्तांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात आंदोलन छेडले जाणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील बहुतेक आंदोलक आज मुक्कामासाठी नवी मुंबईत आले. सध्या पावसाळा असल्याने या आंदोलकांना निवाऱ्याची व्यवस्था मिळावी यासाठी सकल मराठा समाजाने महापालिका आयुक्त आणि सिडको प्रशासनाला विनंती केली होती. वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर, नेरुळ येथील आगरी कोळी सांस्कृतिक भवनसह अन्य काही इमारती आंदोलकांसाठी खुल्या कराव्यात, अशी मागणी सकल मराठा समाजाने केली होती. मात्र पालिका प्रशासनाने या मागणीला कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सकल मराठा समाजाचे पदाधिकारी संतप्त झाले. त्यांनी महापालिका आयुक्तांच्या निषेधार्थ पालिका मुख्यालयात घोषणा दिल्या.
एपीएमसीत मुक्कामाची व्यवस्था
पालिका आणि सिडकोने हात वर केल्यानंतर सकल मराठा समाजाने नवी मुंबईत येणाऱ्या आंदोलकांची व्यवस्था एपीएमसीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये आणि फळ मार्केटमध्ये केली. कांदा-बटाटा मार्केटमधील ओपन शेडही आंदोलकांसाठी खुल्ले करण्यात आले. गेल्यावेळी नवी मुंबईत झालेल्या आंदोलनाच्या वेळी लाखो आंदोलक एपीएमसी मार्केटमध्येच मुक्कामाला होते.