मराठा आरक्षण : धाराशिवला तरुणीने विष घेतले, संभाजीनगरात तरुणाचा गळफास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग कायम असतानाच धाराशिव जिल्ह्यातील तृष्णा तानाजी माने या तरुणीने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली आहे, तर बी.एस्सी.पर्यंत शिकूनही नोकरी मिळत नसल्याने निराश झालेल्या उमेश आसाराम यंडाईत या संभाजीनगरातील तरुणाने गळफास घेतला आहे.मूळ कळंब तालुक्यातील देवळालीची तृष्णा माने ही तरुणी धाराशिवच्या व्ही.जे. कॉलेजमध्ये बी. कॉम.च्या द्वितीय वर्षाला होती. मराठा समाजाच्या मूक मोर्चात ती सहभागी होती. तृष्णाच्या घरी २० एकर शेती असून, वडिलांवर ढोकी येथील स्टेट बँकेचे ३ लाखांचे कर्ज १२ लाखांवर पोहोचले होते. यातच तृष्णाने २९ जुलै रोजी विष घेतले. मराठा आरक्षणासाठी आपण विष घेत असल्याचे तिने भावाला सांगितले होते. धाराशिवच्या पल्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच बुधवारी तृष्णाचा मृत्यू झाला. तिच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ आहेत.

७ ऑगस्टची डेडलाइन ! मागण्या मान्य करा, अन्यथा …

धाराशिवच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनानंतर तृष्णाचे पार्थिव अंत्यविधीसाठी देवळाली येथे आणण्यात आले. परंतु ग्रामस्थांनी मदतीचे आश्वासन मिळेपर्यंत अंत्यविधी न करण्याचा पवित्रा घेतला. तहसीलदार अशोक नांदलगावकर यांनी निवेदन स्वीकारून मागण्या शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन दिल्यानंतर तृष्णावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पदवी घेऊनही नोकरी मिळत नसल्यामुळे संभाजीनगरच्या चिकलठाणा भागातील उमेश आसाराम यंडाईत (२२) याने आज दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यापाठोपाठ संतप्त झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकत्र्यांनी उत्स्फूर्त रास्तारोको केला. आत्महत्या करण्यापूर्वी उमेशने चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात शिक्षण अपूर्ण राहिले, आरक्षण नसल्यामुळे नोकरीही मिळत नाही म्हणून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ व बहीण आहे.