
127व्या घटना दुरुस्तीनंतर राज्य सरकारला मराठा समाज मागास आहे किंवा नाही, हे ठरविण्याचा अधिकार असून आता जास्त वेळ न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी व ती निर्णायक असावी, असे प्रतिपादन खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी येथे केले. सकल मराठा समाजाच्या वतीने नांदेड येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळय़ाजवळ आयोजित करण्यात आलेल्या मराठा मूक आंदोलनप्रसंगी ते बोलत होते.
…तर खासदारकी सोडली असती
संसदेच्या नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा आपण मांडला. त्यासाठी लढण्याची भूमिकादेखील मांडली, त्यावेळी संसदेत आपल्याला बोलण्यापासून रोखण्यात आले. त्यानंतर पुन्हा बोलायची संधी मिळाली. मला बोलू दिले नाही यासाठी काही खासदार आक्रमक झाले, त्यांचा मी आभारी आहे. आपल्याला संसदेत बोलू दिले नसते तर आपण खासदारकी सोडली असती, अशी भूमिकाही खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मांडली.
एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन
मंत्री अशोकराव चव्हाण यांनी राज्यात 23 वसतिगृहे 15 ऑगस्टपूर्वी सुरू करू असे सांगितले होते. ती अद्यापपर्यंत सुरू झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. या सरकारच्या काळात केवळ ठाण्यामध्ये मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून एक वसतिगृह सुरू झाले. शिंदे यांचे आम्ही अभिनंदन करतो, असेही छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी यावेळी सांगितले.

























































