निसर्गाचा आदर करा!

1496

>> मृणाल दुसानीस, अभिनेत्री

लॉकडाऊनच्या काळात मी नाशिकला माझ्या आईबाबांसोबत होते. सुरुवातीला थोड टेन्शन साहजिकच आलं होतं; कारण सगळ्यांच्या आयुष्यात अशी परिस्थिती पहिल्यांदाच आली होती. त्यातल्या त्यात चांगली गोष्ट म्हणजे, संपूर्ण कुटुंब घरात एकत्र होतं. त्यामुळे मी कम्फर्टेबल होते. कुटुंब एकत्र असलं तर आपण कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो असं मला वाटतं. आताच्या तुलनेत त्यावेळी नाशिकला कोरोनाबाधितांची संख्या खूपच कमी होती. त्यामुळं आम्ही खूप रिलॅक्स होतो.

अचानक मिळालेली सुट्टी सगळ्यांनाच आनंद देऊन जाते. खूप वर्षांनी आईबाबांसोबत मी छान वेळ घालकला. घरी मनसोक्त आराम करायला मिळाला. वेगवेगळ्या रेसिपीज बनवून  आईबाबांना खाऊ घातल्या. इतर वेळी माझ्या हातचं खाण्याची संधी त्यांना खूप कमी वेळा मिळते. मला वाचनाची खूप आवड आहे. काही पुस्तकं मी विकत घेऊन ठेवली होती. त्यातली न वाचलेली पुस्तकं यादरम्यान वाचली. आमच्या चॅनेलसाठी काही प्रमोशनल व्हिडीओचे शूटिंग घरातूनच केले. त्या माध्यमातून मी प्रेक्षकांशीदेखील कनेक्ट होते. हे सगळं सुरू असताना परिस्थिती पूर्ववत कधी होईल, काम पुन्हा कधी सुरू होईल याचीही वाट पाहत होते.

दैनंदिन आयुष्यात आपण खूप गोष्टी गृहीत धरतो. सध्या सगळीकडं अनिश्चिततेचं सावट आहे. त्यामुळं आहे त्या परिस्थितीत स्वतःला कम्फर्टेबल करून घेणं, समोर आलेल्या आव्हानांचा सामना करायला तयार राहणं हे लॉकडाऊनदरम्यान शिकायला मिळालं. आपल्या कामाचा आणि वर्कप्लेसचा आदर करायला हवा हेदेखील गेल्या तीन-चार महिन्यांत लोकांना कळलंय.

या काळात रस्त्यावर फारशा गाड्या नव्हत्या, प्रदूषण नव्हतं. त्यामुळं वेगवेगळय़ा पक्ष्यांचे आवाज ऐकू येत होते. अगदी मुंबईकरांनीही लॉकडाऊनदरम्यान हे सुख अनुभवलयं. पैसा, प्रसिद्धी आणि कुठल्याही भौतिक गोष्टींपेक्षा निसर्ग खूप मोठा आहे हे या दरम्यान सगळ्यांना जाणवलं. निसर्गामुळं कुठलीही परिस्थिती कधीही बदलू शकते. त्यामुळं निसर्गाचा आदर करा आणि आपल्या अवतीभोवतीच्या परिसराचं संवर्धन करा!

समजूतदारीने वागा!

कोरोनामुळे आपण आपल्या एकट्याचा जीव धोक्यात घालत नाही, तर संपूर्ण कुटुंबाला त्या संकटात ओढतोय. त्यामुळं पुन्हा एकदा ‘न्यू नॉर्मल’ आयुष्य जगताना काय काळजी घ्यावी हे आता प्रत्येकाला कळून चुकलंय. प्रत्येकाने समजूतदारीनं, जबाबदारीनं वागायला हवं आणि योग्य ठिकाणी थांबायचं आपल्याला कळलं पाहिजे.

पुन्हा सेटवर!

आपल्यावर जबाबदार्‍या असतात आणि आपण कामासाठी बाहेर पडतो तेव्हा आपण आपोआप काळजी घेतो. गेल्या 15 दिवसांपासून मी पुन्हा एकदा ‘सुखांच्या सरींनी मन हे बावरे’ मालिकेच्या ठाण्यातील सेटवर परतलेय. इथे खूप काळजी घेतली जातेय. निम्मा स्टाफ सेटवरच राहतो.  बाहेरून येणार्‍यांची फारशी वर्दळ सेटवर नाही. त्यामुळे काम करताना फारशी भीती वाटत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या