
सत्तेच्या बळावर शेतकऱयांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणे हे केवळ अमानुषच नव्हे तर निषेधार्ह आहे, असे म्हणत महाराष्ट्रातील साहित्यिकांनी दिल्लीतील शेतकऱयांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. केंद्र सरकारने तातडीने आंदोलनकर्त्या शेतकऱयांशी संवाद साधावा, अशी अपेक्षा साहित्यिकांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रातील साहित्यिकांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सुरुवातीला आंदोलनकर्त्या शेतकऱयांचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न झाला. कडाक्याच्या थंडीतही पाण्याचे फवारे, अश्रुधूर आणि लाठी हल्ला करत सरकारने अमानुषपणे शेतकऱयांचे हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. तरीही निर्धाराच्या जोरावर शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.
कोरडवाहू आणि आर्थिकदृष्टय़ा दुबळ्या असलेल्या शेतकऱयांची अशी भावना आहे की, शेतमालाच्या हमीभावाचे जे कवच आहे ते गळून पडेल. त्याकडे साफ दुर्लक्ष करून सत्तेच्या बळावर शेतकऱयांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणे हे केवळ अमानुषच नव्हे तर निषेधार्ह आहे. शेतकऱयांचा हा असंतोष खदखदत असताना त्यांच्याशी संवाद करण्याचे दायित्व सुद्धा हे सरकार पार पाडत नाही हे संतापजनक असल्याचे मत यावेळी व्यक्त केले आहे.
निवेदनात राजन गवस, भास्कर चंदनशिव, अतुल देऊळगावकर, नारायण कुळकर्णी कवठेकर, आसाराम लोमटे, आनंद विंगकर, प्रमोद मुनघाटे, बालाजी सुतार, सुरेखा दळवी, अरुणा सबाने यांची नावे आहेत.


























































