साहित्य महामंडळाला मराठीची चिंता; अभिजात भाषेचा दर्जा, मराठी शाळा आणि ‘ळ’चा आग्रह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साहित्य महामंडळाने पुन्हा एकदा मराठीबद्दल चिंता व्यक्त करत अभिजात भाषेचा दर्जा, मराठी शाळा, मराठी अधिकारी आणि ‘ळ’चा आग्रह असे ठराव आज संमेलनाचा समारोप करताना केले.

94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आज सूप वाजले. प्रथेप्रमाणे महामंडळाच्या नियामक बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आले. यंदा ठरावांचा सर्व भार होता तो ‘मराठी’वरच! अर्थात अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱयांच्या भविष्यासाठी राज्यातील सर्व साहित्यप्रेमी सक्रिय असे आश्वासन देतानाच केंद्र व राज्य शासनाने बळीराजाला सर्वतोपरी मदत करावी, अशी मागणीही साहित्य महामंडळाने केली आहे.

कर्नाटक सरकारचा निषेध

कर्नाटक सरकारकडून सीमा भागातील मराठी भाषेची गळचेपी वाढत आहे. सरकारी पातळीवरील परिपत्रके मराठी भाषेतून देणे बंद केले आहे. सभा, संमेलनात मराठी भाषणांवर बंधने लादली जात आहेत, त्यांच्या या धोरणाचा आणि निर्णयाचा निषेध करण्यात आला.

‘म’ मराठीचा

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, असा प्रस्ताव राज्य सरकारने दिला असून हा प्रस्ताव केंद्र सरकारने तातडीने मार्गी लावाला, मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडू नयेत यासाठी राज्य सरकारने तातडीने कृती कार्यक्रम आखावा, यापुढे बृहन्महाराष्ट्रातील मराठी भाषेसाठी स्वतंत्र मराठी विभाग स्थापन करण्यात यावा, पणजी येथील महाराष्ट्र परिचय केंद्राचे पुनरुज्जीवन करावे आणि सर्व राज्यांतील महत्त्वाच्या ठिकाणी परिचय केंद्रे स्थापन करून तेथे मराठी व्यक्तींचीच अधिकारी व कर्मचारी म्हणून नियुक्ती करावी. केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयात ‘ळ’ या वर्णाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश द्यावेत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

आणखी काही महत्त्वाचे

  • सार्वजनिक ग्रंथालये टिकावीत आणि वाढावी यासाठी राज्य शासनाने सक्रिय पावले उचलावीत. ग्रंथालयांतील कर्मचाऱयांना किमान जगण्याइतके वेतन द्यावे. ग्रंथालय संघाच्या या मागणीला साहित्य संमेलनाचा पाठिंबा आहे. ग्रंथालय चालकांनी दर्जेदार पुस्तके खरेदी करावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
  • न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या निफाड येथील स्मारकाचे अपूर्ण असलेले काम राज्य शासनाने लक्ष घालून त्वरित पूर्ण करावे, तसेच नाशिक येथे साहित्यिक बाबुराव बागूल आणि वामनदादा कर्डक यांचे उचित स्मारक उभारावे, अशी मागणी करण्यात आली.
  • महाराष्ट्रात साठहून अधिक बोलीभाषा आहेत. त्यातील काही बोली नामशेष होत आहेत. बोलीभाषांना उत्तेजन देऊन त्यांचे संवर्धन कसे करता येईल, यासाठी राज्य सरकारने तज्ञांची समिती नेमावी.

95वे साहित्य संमेलन उदगीरला

95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन लातूर जिह्यातील उदगीर येथे होणार आहे. चार महिन्याच्या आत हे पुढील संमेलन घेण्यात येईल, तर पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा नाशिकला संमेलन भरवू, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले–पाटील यांनी नाशिक येथे दिली.