हसता हसता हाताळलेला गंभीर प्रश्न

>>क्षितिज झारापकर kshitijzarapkar@yahoo.com

‘आली तर…पळापळ’. स्त्रीयांच्या अत्यंत महत्त्वाच्या, गंभीर आणि आजतागायत तोडगा न निघालेल्या प्रश्नाला या नव्या नाटकाने हात घातला आहे.

मी एका छोटेखानी कॅफेत बसून काही लिखाण करीत होतो. हे कॅफे एका निवासी बिल्डिंगच्या तळमजल्यावर होतं. छोटय़ा दुकानाकरिता गाळे असतात तशा एका गाळ्यात. अचानक एक माणूस आत शिरला आणि मॅनेजरला अद्वातद्वा बोलू लागला. वाद बराच वेळ चालल्यानंतर लक्षात आलं की, मुद्दा लघुशंकेचा होता. कॅफेला शौचालयाची परवानगी नव्हती. त्यांची गिऱहाईकं शेजारच्या इमारतीतल्या एका खूप मोठय़ा आणि पॉप्युलर रेस्टॉरन्टच्या बाथरूमचा वापर करायची. त्या रेस्टॉरन्टचा मालक जाब विचारत होता. ही घटना मुंबईच्या शिवाजी पार्क भागात अगदी गडकरी चौकातली आहे. काही वर्षांपूर्वी समोरच्याच गल्लीत कोहिनूर मिलच्या भिंतीला लागून एक सार्वजनिक मुतारी होती. मिलचा कोहिनूर स्क्वेअर झाला आणि ही सोय तोडली गेली. आता स्काऊट हॉलच्या शेजारी म्हणजे किमान एक किलोमीटर लांब सुलभ शौचालय आहे. ही झाली पुरुषाची सोय. स्त्र्ायांची अवस्था तर याहून कितीतरी पटींनी बिकट आहे आणि स्त्र्ायांच्या या समस्येला वाचा फोडायला एक नवीन मराठी नाटक रंगभूमीवर सज्ज झालंय. माई प्रॉडक्शन्स आणि स्मित हरी प्रॉडक्शन्स निर्मित ‘आली तर… पळापळ’ हे ते नाटक.

स्त्रीयांच्या शौचालयाचा हा प्रश्न तसा अत्यंत गंभीर, पण स्वतःला समाजमनाचा आरसा म्हणवणाऱया मराठी रंगभूमीला हा प्रश्न ठळकपणे हाताळावा असं काही आजवर वाटलं नव्हतं. राजेश कोळंबकर या गुणी लेखकाला या भेडसावणाऱया प्रश्नावर नाटक लिहावं असं वाटलं हेच मुळी कौतुकास्पद आहे. चारचौघात या नैसर्गिक क्रियेची वाच्यता करायला कचरणारा आपला समाज. त्यासाठी मग या गरजेसाठी अनेक अलंकारिक उपमा शोधण्यात आल्या. राजेश नाटकाची सुरुवात इथूनच करतो. मग तो पश्चिमेत गाजलेल्या ‘व्हजायना मोनोलॉग्ज’प्रमाणे (इथे ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’) मुतारीबद्दल खूप प्रकर्षाने आणि हेतुपुरस्सर बोलतो. मग तो वेगवेगळ्य़ा स्तरांतल्या बायकांच्या बाबतीत प्रश्न सारखाच असल्याचं दाखवून देतो आणि या थाटात राजेश कोळंबकर ‘आली तर… पळापळ’ हे नाटक पुढे सरकवत नेतो.

या नाटकाचं सादरीकरण बिनचूक झालेलं आहे. लोकनाटय़ाचा बाज वापरून असंख्य स्थळं आणि काळ उभं करण्याचं चातुर्य या सादरीकरणात दिसतं, पण असा फॉर्म तेव्हाच निवडला जातो जेव्हा नाटकातील कलाकार तगडे असण्याची खात्री असते. ‘आली तर… पळापळ’मधील सर्व कलाकार अत्यंत गुणी आणि कुशल आहेत हे विशेष नमूद करायला हवं. समाज प्रबोधन करणारी नाटकं मराठी रंगभूमीला नवीन नाहीत. पण बऱयाचदा ही अशी नाटकं रटाळ आणि कंटाळवाणी असतात. मग प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याकरिता निर्मात्यांना सरकारी किंवा सेवार्थ संस्थांची मदत घ्यावी लागते. स्मित हरी प्रॉडक्श्न्सच्या हरी पाटणकर, त्यांच्या पत्नी स्मिता आणि योगेश लोहकरे यांनी या प्रॉब्लेमचं एक मूलभूत सोल्युशन काढलं. ते सोल्युशन म्हणजे विनोदाचा बादशहा प्रदीप पटवर्धन. प्रदीपने या अत्यंत गंभीर विषयाला आपल्या शैलीने एका अत्यंत आकर्षक वेष्टनात गुंडाळलंय. त्यामुळे आपल्याला ‘आली तर… पळापळ’ पाहताना हसावंच लागतं, पण प्रदीप हा किती प्रगल्भ कलावंत आहे हेही ‘आली तर… पळापळ’मध्ये दिसून येतं. या नाटकाची बाकीची सगळी कास्ट ही नवीन रंगकर्मींची आहे. प्रदीप यात एका सूत्रधाराच्या भूमिकेत आहे. ‘आली तर… पळापळ’मध्ये प्रदीपने कुठेही या नऊ नवोदितांवर मात करण्याचा साधा प्रयत्नही केलेला नाही. तसं करायची गरजही नाही. कारण ही सगळी तरुण मंडळी अत्यंत प्रतिभावान आहेत. दीपा माळकर, स्नेहा पराडकर, प्रियंका सातपुते, रंजना म्हाब्दी, सुशील पवार, सचिन वळंजू, नितीन जंगम आणि सुरेश तांबे ही सगळी कलाकार मंडळी खरं तर या नाटकाला एक समाज प्रबोधनात्मक कॉमेडी बनवतात. ‘आली तर… पळापळ’चं यश याच्या कामगिरीतच दडलेलं आहे. यातल्या मुली नाचतात छान, गातातही उत्कृष्ट (बेसूर गाणंही त्यांनी उत्तम केलंय) आणि अभिनय तर भन्नाट करतात. यातली मुलं आपापलं टायमिंग इतकं कमाल सांभाळतात की, काही ठिकाणी प्रदीप पटवर्धनही मंचावर दाद देताना दिसतात. हे उत्तम आहे. अशा वातावरणामुळे नाटकाचे प्रयोग अधिक रंगतदार होतात.

महिलांकरिता मोफत सुलभ शौचालय नसल्याने त्यांची होणारी कुचंबणा ही अतितीव्र आहे, पण याबाबत काही करावं हा विचार ना आजवर समाजाने केला ना सरकारने. पुरुषांसाठी तुरळक का असेना, शौचालये आहेत. मग बायकांना का नाही? याच नावाने हे नाटक आधी स्पर्धेत आलं. ते स्मित हरी व माई प्रॉडक्शन्सने व्यावसायिक रंगभूमीवर ‘आली तर… पळापळ’ या नावाने आणलंय. आपल्या माता, भगिनींच्या बेसिक प्रॉब्लेमला वाचा फोडण्यासाठी या टीमने उचललेलं हे पाऊल खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. हे नाटक चालायलाच हवं. कारण यातच समस्त स्त्रियांचं आणि रंगभूमीचं हित आहे.

नाटक: आली तर… पळापळ

निर्मिती: माई प्रॉडक्शन्स + स्मित हरी प्रॉडक्शन

निर्माते: योगेश लोहकरे, स्मिता पाटणकर, पप्पी वाडीभास्मे, चंद्रकांत सुरकार

निर्मितीप्रमुख: मच्छिंद्र कदम, मनोज चाळके

सूत्रधार: हरी पाटणकर

लेखक: राजेश कोळंबकर

दिग्दर्शक: अक्षय अहिरे

कलाकार : ९ कलाकारांसह प्रदीप पटवर्धन

दर्जा: ***