पडद्याआडून: ‘द दमयंती दामले’ घरगुती राजकारणाची धमाल दंगल

marathi-drama-da-damyanti-damale

>> पराग खोत

टीव्ही मालिकांमधली सासू-सुनांचं भांडणं म्हणजे आपल्या संस्कृतीचा अघोषित राष्ट्रीय खेळ. निर्बुद्ध मालिकांचं अविरत चऱहाट या एका विषयावर वर्षानुवर्षे सुरू राहू शकतं. मात्र हाच विषय जेव्हा मराठी रंगभूमीवर येतो आणि त्याला संतोष पवार टच लाभतो तेव्हा हास्य आणि मनोरंजनाची मेजवानीच पुढे येते. ‘द दमयंती दामले’ हे नाटक म्हणजे याच मिसळीला दिलेली खुसखुशीत फोडणी आणि त्यातून तयार झालेली खमंग डिश म्हणता येईल. मध्यवर्ती भूमिकेतील दमयंती दामले ही खमकी व्यक्तिरेखा केवळ एक सासू नसून घराला लागणाऱया ग्रहणाला दूर करू शकणारी स्त्रीशक्तीच आहे. तिच्या दोन सुना आणि त्यांच्या प्रभावाखाली असलेले तिचे दोन मुलगे यांच्याभोवती फिरणारी ही मॅडचाप गोष्ट.

सुधांशू-मृण्मयी आणि अंशुमन-तन्मयी या भावा-भावजयींच्या दोन जोडय़ा. एरव्ही त्या दोन जावांत असलेला जळजळीत मत्सर, सासू समोर असली की सासूविरुद्ध मात्र संयुक्त मोर्चेबांधणीत बदलतो. पण त्या दोघींना आपल्या दोन शेंबळट मुलांसह पुरून उरते आणि राजकारण शिकायचं असेल तर घरगुती ‘वॉर्ड कमिटी’कडूनच शिका, असा संदेशच देते ती ‘द दमयंती दामले’.

नातवंडं बोर्डिंगला, मुलं पाठीचा कणा नसलेल्या नंदीबैलांसारखी आणि सुना कटांच्या खलबतांचा ताजमहाल उभारण्यात गुंतलेली. घर म्हणजे गृहकलहाचा 24×7 न्यूज स्टुडिओ आणि अँकर तर ती दमयंती, जी स्वतःच सतत ‘ब्रेकिंग न्यूज’ होत असते. नाटकात खरी फोडणी टाकली जाते ती दमयंतीच्या छोटय़ाशा अपघाताने. मोठय़ा सुनेच्या रील बनवण्याच्या सवयीमुळे ‘मिनिस्टरला टॅग केलं’ जातं आणि मंत्री थेट घरात येतात. मग काय होतं? दमयंती एक कानाखाली देऊन सत्तेच्या गाडीलाच पंक्चर करते! हा प्रसंग म्हणजे रंगभूमीवरचा ‘विधिमंडळातील प्रश्नकाल’ जणू. फरक एवढाच की इथे स्पीकरही दमयंतीच.

यानंतर या मध्यमवर्गीय घरात सुरू होतो पोलीस, मीडिया आणि कटांचा हायव्होल्टेज हास्योत्पादक ड्रामा. सुना एकामागून एक जाळं विणतात, पण दमयंतींच्या अनुभवाच्या पिशवीतली राजकारणाची कात्री एवढी तीक्ष्ण की त्या जाळ्यातल्या गाठी ती शिताफीने कापून काढते. संतोष पवारांनी घेतलेला एक उत्तम निर्णय म्हणजे पडद्यामागे ते काही ठेवत नाहीत. सगळा दंगल कार्यक्रम ते प्रेक्षकांच्या साक्षीने सर्वांसमोरच घडवतात. घरातली भांडणं दडवून ठेवायची पद्धत मध्यमवर्गीय कुटुंबात असेल; पण नाटकात मात्र सगळं बिनधास्त, धमाकेदार. प्रत्येक प्रसंगात घडामोडींची गाडी सुसाट जाते – कधी राजकीय, कधी घरगुती तर कधी विनोदी बाजाने. पहिल्या अंकात काहीसं घसरलेलं आणि पसरलेलं नाटक नंतर सावरतं आणि वेग घेतं. सजावट, प्रकाशयोजना, संगीत – सगळं ‘स्वच्छ कारभार’ या आश्वासनासारखं. बाहेरून चमकदार आणि आतून उपयोगी. विशेषतः अमोघ फडके यांची प्रकाशयोजना. कधी सुनांच्या कटांना सावलीचा धक्का देते, तर कधी दमयंतीच्या विनोदाला लख्ख उजेडात उजळवून टाकते.

सर्वच कलाकारांनी त्यांच्या भूमिका समजून केल्या असल्या तरीही या नाटकाचा मजबूत स्तंभ म्हणजे विशाखा सुभेदार होय. त्यांनी रंगमंचावर अशी अफलातून दमयंती साकारली आहे की सासूविषयक सर्व मीम्स त्यांच्यासमोर नतमस्तक होतील. त्यांची संवादफेक म्हणजे तिरकसपणाची धडधडती तोफ. खटय़ाळपणा, तिखटपणा, प्रेम, राग, लोभ सगळं सगळं एका डोळ्याच्या हालचालीत. त्यांनी रंगमंचावर सादर केलेलं नृत्य म्हणजे नाटकाचा हायलाईट ठरावा. त्यांच्यासोबत पल्लवी वाघ – केळकर आणि सुकन्या काळण यांनी सुनांची एकदम टोकदार आवृत्ती सादर केली आहे. मात्र विशाखा सुभेदार यांच्या झंझावातापुढे सगळेच कलाकार नवखे वाटतात.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमुळे नावारुपाला आलेले अनेक गुणी कलावंत सध्या रंगभूमीकडे वळलेले दिसताहेत. मात्र विशाखा सुभेदार या मूळच्या नाटकवाल्याच. ‘एक डाव भटाचा’मध्ये त्यांनी वैभव मांगले आणि भूषण कडूसोबत घातलेला धुमाकूळ प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात आहे. एकुणात ‘द दमयंती दामले’ हे नाटक नाही तर हे घरगुती राजकारणाचं ऑपरेशन थिएटर आहे. विनोदाची भूल देत, गृहकलहाची शस्त्रक्रिया करून त्यावर संस्कारांची मलमपट्टी कशी करावी हे सप्रमाण दाखवत असताना हसून हसून तुमच्या पोटात गोळे आणणारी एक खास संतोष पवार यांची छाप असलेली कॉमेडी.

लेखक : संतोष पवार
दिग्दर्शक : संतोष पवार
कलाकार : सुकन्या काळण, पल्लवी वाघ, सागर खेडकर, वैदेही करमरकर, क्षितिज, प्रतीक पाध्ये आणि विशाखा सुभेदार
नेपथ्य : संदेश बेंद्रे
प्रकाशः अमोघ फडके
संगीतः जितेंद्र कुलकर्णी
वेशभूषाकार : अर्चना ठावरे शहा
निर्माते : नितीन भालचंद्र नाईक
गीते : नचिकेत जोग, संतोष पवार