मराठी भाषेचा समृद्ध वारसा पुढे चालविण्याची गरज – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई

मराठी भाषेचा समृद्ध वारसा पुढे चालविण्याची गरज असून यासाठी ‘मराठी बोला, मराठीतून व्यवहार करा व मराठीचा आग्रह धरा’ असे आवाहन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केले.

मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती  मंडळ, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, उच्च व तंत्र शिक्षण (ग्रंथालय) विभाग आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा पंधरवडानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात या पंधरवड्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने उद्घाटन झाले.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने राज्य शासनाच्यावतीने ग्रंथप्रदर्शन, अभिवाचन स्पर्धा आणि मराठी प्रश्नमंजुषा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि.14 ते 28 जानेवारी 2021 या कालावधीत हा पंधरवडा साजरा केला जाणार आहे.

मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई म्हणाले, मराठी भाषा विभागाने मराठी भाषेच्या सर्व उपक्रमांना पुढे नेण्याचे काम केले आहे. ते कौतुकास्पद असून त्याचे फलित आज दिसू लागले आहे. मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी मराठी भाषेला पुढे नेण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्यासाठी काही ना काही लिखाण करीत आहेत. ही मंत्रालयाला लाभलेली प्रदीर्घ परंपरा आहे. मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी ही परंपरा पुढेही चालू ठेवावी, असे आवाहन  देसाई यांनी केले.

प्रत्येक विभागात कारभार मराठीत झाला पाहिजे. बँक, पोस्ट, रेल्वे या ठिकाणी मराठी भाषेमधून व्यवहार व्हावा यासाठी आग्रह धरला पाहिजे. राज्यातील केंद्र सरकारच्या कार्यालयातील कारभार मराठी भाषेतून व्हावा असे केंद्र सरकारचे धोरण आहे. या धोरणाचा त्या ठिकाणी प्राधान्याने वापर व्हावा. केंद्रीय कार्यालयात दर्शनी भागावर मराठीमध्ये फलक लावण्यात यावे, असेही  देसाई यांनी सांगितले.

केवळ एक दिवस गोड गोड बोला असे नसून कायमच आपल्याला मराठीचा गोडवा पुढे नेवून तो जपायचा आहे. केवळ ‘बोलतो मराठी’ म्हणून चालणार नाही तर आपल्या रोजच्या शासन कारभारात ‘वापरतो मराठी, आग्रह धरतो मराठी’ असा उल्लेख केला पाहिजे, असे प्रतिपादन देसाई यांनी यावेळी केले.

आपली प्रतिक्रिया द्या