
महाभारतातील गूढ आणि चर्चित व्यक्तिरेखा असलेला अश्वत्थामा आता रंगभूमीवर अवतरला आहे. प्रसिद्ध साहित्यिक, नाटककार व अभिनेते अशोक समेळ यांच्या गाजलेल्या कादंबरीवर आधारित ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ हे नाटक रंगमंचावर सादर होत आहे. अश्वत्थाम्याचे चिरंजीवित्व, त्याचा नीलमणी आणि कलियुगातील त्याचे अस्तित्व यांसारख्या अनेक प्रश्नांचा शोध या नाटकातून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन स्वतः अशोक समेळ यांनी केले असून, वयाच्या 84 व्या वर्षी ते स्वतः अश्वत्थाम्याची प्रमुख भूमिका साकारत आहेत. धनश्री दामले यांचीही नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. विश्वास पिंपळे यांचे नेपथ्य, शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना आणि संग्राम समेळ यांचे पार्श्वसंगीत नाटकाची जमेची बाजू ठरत आहे. ‘ऋग्वेद’ या नाटय़संस्थेने या नाटकाची निर्मिती केली आहे. अश्वत्थाम्याचा या कलियुगात शोध घेणाऱया आणि त्याच्याविषयी पुतुहूल असणाऱया प्रत्येकासाठी हे नाटक म्हणजे मोठी पर्वणी ठरणार आहे.
अशोक समेळ यांची ही महाकादंबरी 2015 साली आली, तिच्या 9 आवृत्त्या निघाल्या आणि आता त्यावर नाटक आले आहे. गेली 25 वर्षे या विषयावर संशोधन केल्यानंतर हे नाटक साकारल्याचे अशोक समेळ यांनी सांगितले. या नाटकाचे प्रयोग व्यावसायिक रंगभूमीवर सुरू झाले आहेत.























































