
मुंबईसह राज्यातील केंद्र सरकारची सर्व कार्यालये, बँका, पोस्ट ऑफिस, विमा, रेल्वे, मेट्रो, मोनो, विमानतळ, पेट्रोलियम कंपन्या व केंद्राच्या सार्वजनिक उपक्रमांमध्ये मराठी भाषेचा सर्वात प्रथम वापर करण्याचे आदेश राज्याच्या मराठी भाषा विभागाने जारी केले आहेत. त्यामुळे आता विमानतळापासून बँका व केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा आवाज दुमदुमणार आहे.
केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्रीय कार्यालयांत इंग्रजी व हिंदी भाषेबरोबर स्थानिक मराठी भाषेचा वापर बंधनकारक आहे. त्यानुसार केंद्रीय कार्यालयांमध्ये हिंदी व इंग्रजी भाषेबरोबरच प्रादेशिक भाषेचा प्रथम क्रमांकावर वापर करण्याच्या केंद्र सरकारच्याच सूचना आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातील केंद्रीय कार्यालयांत मराठी भाषेचा वापर करणे बंधनकारक आहे. पण राज्यातील केंद्र सरकारची कार्यालये खासकरून विमानतळ, बँका, विमा कंपन्यांसह इतर कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर होत नसल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे मोठय़ा प्रमाणावर आल्या आहेत.
मराठी भाषा विभागाच्या या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. केंद्रीय कार्यालयांमध्ये मराठी वापर होत असल्याबद्दल स्वयंघोषणापत्र संबंधित कार्यालयांकडून भरून घ्यावे लागणार आहे. केंद्रीय कार्यालयांमध्ये मराठीचा वापर होतो का यावर लक्ष ठेवण्यासाठी अधिकाऱयाची नियुक्ती करावी लागणार आहे.
घोषणा व दिशाफलक मराठीत
केंद्रीय कार्यालयांमार्फत दिल्या जाणाऱया सूचना, प्रवासासंदर्भातील घोषणा, दिशाफलक, वेळापत्रक, नामफलक, आरक्षण नमुने, प्रवासी तिकिटांमध्ये मराठी भाषेचा प्रथम वापर करत असल्याचेही राज्य सरकारला लेखी स्वरूपात द्यावे लागेल. त्याशिवाय बँकांमध्ये सर्व ठिकाणी मराठी भाषेचा पर्याय, फॉर्म, पैसे भरणे व काढण्याच्या स्लिप व डिमांड ड्राफ्टसाठी अर्ज मराठी भाषेत उपलब्ध असल्याची ग्वाही महाराष्ट्र सरकारला द्यावी लागणार आहे.
मराठीचा मान प्रथम
केंद्रीय कार्यालयांमधील नावांच्या पाटय़ा, सूचना फलक, जाहिरात मराठी भाषेत असणे आवश्यक आहे. त्यासाठी मराठी, हिंदी व इंग्रजी असा प्राधान्यक्रम असेल.
अधिनियम काय म्हणतो
संविधानाताली कलम 345 मधील तरतुदींच्या अनुषंगाने महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, 1964 व सुधारणा अधिनियम 2015 अन्वये महाराष्ट्र राज्याची राजभाषा म्हणून देवनागरी लिपीतील मराठी भाषा स्वीकारण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील केंद्र सरकारची कार्यालये, बँकिंग, दूरध्वनी, टपाल, विमा, रेल्वे, मेट्रो, मोनो, विमान प्रवास, गॅस, पेट्रोलियम, महामंडळे, प्राधिकरणे व सार्वजनिक उपक्रमातील कार्यालयांमध्ये हिंदी व इंग्रजी भाषेबरोबर प्राधान्याने मराठी भाषेचा वापर करणे आवश्यक आहे.





























































