
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या आणि मुंबई महानगरपालिकेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी पक्षाच्या भूमिकेबाबत प्रतिक्रिया देताना मराठी अस्मितेची लढाई कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. 2022 नंतर सुरू असलेल्या राजकीय संघर्षाचा उल्लेख करत त्या म्हणाल्या की, संख्येचे गणित बदलले असले तरी बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी लावलेले झाड आजही मुंबईत जिवंत आहे आणि मराठी माणूस महा मुंबईत जिंकला आहे.
त्या म्हणाल्या, “संख्येबाबत प्रश्न उपस्थित होऊ शकतात, पण मुंबईत जे काही जनमत मिळाले आहे ते बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरच आहे. बाळासाहेबांचे नाव गरजेपुरते कोण वापरत आहे, हे लोकांना स्पष्ट दिसत आहे. आमची लढाई ही मराठी अस्मितेसाठीच होती, आहे आणि पुढेही राहणार आहे.”
मुंबईत मराठी माणसाला मोठे स्थान मिळाले असल्याचे सांगत पेडणेकर म्हणाल्या की, “आता आम्ही कुठलाही अपशकून करणार नाही. आकड्यांची गणिते आम्हाला मान्य आहेत आणि ती आम्ही स्वीकारली आहेत. सक्षम विरोधी गट म्हणून आम्ही आमची भूमिका पार पाडू. सत्तेत असतानाही आम्हाला अनेकदा विरोधी पक्षाची भूमिका घ्यावी लागली होती, त्यामुळे विरोधी गट म्हणून काम करण्याचा अनुभव आमच्याकडे आहे.”
प्रत्येक नगरसेवक आपल्या विभागातील प्रश्न ठामपणे मांडेल, दबाव किंवा आमिषांना बळी न पडता मुंबईच्या हितासाठी लढेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. “मुंबईसाठी जे जे चांगले आहे, ते करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे त्या म्हणाल्या.
पेडणेकर पुढे म्हणाल्या की, “आम्ही वर्तमानात जगतो आहोत आणि भूतकाळही चांगला ठेवला आहे. त्यामुळे भविष्यकाळ कसा असेल, हे लोकांना दिसेल. आमचे पक्षप्रमुख जे निर्णय घेतात, त्यामागे ठोस आधार असतो आणि आम्ही तो आधार लक्षात घेऊनच काम करतो,” असे त्यांनी सांगितले.






























































