
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक शिवतीर्थावर झालेल्या ‘शिवशक्ती’च्या सभेला मुंबईच्या उपनगरांतून लाखो शिवसैनिक-मनसैनिकांनी हजेरी लावली. शहर आणि उपनगरांतील बहुतांश रस्ते जागोजागी खोदून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीत अडकू नये म्हणून अनेक शिवसैनिक-मनसैनिकांनी लोकल आणि मेट्रो प्रवासाला पसंती दिली. त्यांनी लोकल आणि मेट्रो स्थानकांत ‘मराठी’चा जयजयकार करून परिसर दणाणून सोडला. त्यांच्या गर्दीत शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे झळकत होते. सभेला प्रत्यक्ष हजर राहता न आलेल्या मुंबईकरांनीही सभेच्या दिशेने चाललेल्या शिवसैनिक, मनसैनिक आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या सुरात सूर मिसळत ‘मराठी’चा आवाज बुलंद केला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोन्ही नेत्यांची तोफ धडाडणार असल्याने आबालवृद्धांनी दादरकडे कूच केले होते. मराठी माणूस आणि मुंबईचे अस्तित्व जपण्याच्या भावनेतून दोन्ही नेत्यांकडून दिला जाणारा संदेश ऐकण्यासाठी सर्वांमध्ये लगबग दिसून येत होती. त्यामुळे रस्ते प्रवासात रखडता कामा नये, याची खबरदारी शिवसैनिक आणि मनसैनिकांनी घेतली. त्यादृष्टीने नियोजन करून बहुतांश शिवसैनिक-मनसैनिकांनी लोकल ट्रेन आणि भुयारी मेट्रोने दादर गाठले.
मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील दादर स्थानकांत दुपारपासून सायंकाळपर्यंत ‘मराठी’चा जयजयकार सुरू होता. ‘मुंबई आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, ‘ठाकरे ब्रँड अंगार है, बाकी सब भंगार है’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. दादर रेल्वे स्थानकाहून हजारो शिवसैनिक-मनसैनिक शिवतीर्थाच्या दिशेने मार्गस्थ होत होते.
दादर मेट्रो स्थानकातही प्रचंड गर्दी झाली होती. रविवारी लोकल रेल्वेचा ब्लॉक असतो. त्यामुळे सभेला जाण्यास उशीर होऊ नये म्हणून आम्ही शिवसैनिक भुयारी मेट्रोने आलो, असे प्रशांत माने यांनी सांगितले.





























































