
सामना प्रतिनिधी । मुंबई
19 व्या शतकातील प्रसिद्ध चित्रकार राजा रवि वर्मा यांच्यानंतरचे दुसरे लोकप्रिय चित्रकार एम. व्ही. धुरंधर यांच्या दुर्मीळ चित्रांचे प्रदर्शन सध्या काळाघोडा येथील नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट येथे सुरू आहे. या रोमँटिक रिऑलिस्टक प्रदर्शनाला मुंबईकर रसिकांचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे. त्यांच्या चित्रांतील मराठमोळय़ा संस्कृतीचे दर्शन घडवणारा अनोखा ’आर्ट वॉक’ आज आयोजित करण्यात आला. त्यातून धुरंधर शैली उलगडत गेली आणि कलारसिक गतकाळात रममाण झाले.
रावबहादूर धुरंधर यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या चित्रांचे भव्य पाच मजली प्रदर्शन काळाघोडा येथील नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट संस्थेने (एनजीएमए)10 सप्टेंबरपासून आयोजित करण्यात आले आहे. केंद्रीय सांस्कृतिक खाते, राज्य सरकार, दिल्ली आर्ट गॅलरी आणि स्वराज्य आर्ट अचिव्ह यांचे सहकार्य प्रदर्शनाला लाभले आहे. यासाठी देशविदेशात विखुरलेली धुरंधरांची चित्रे प्रथमच एका छताखाली आणण्यात आली आहेत. औंध, सातारा, सांगली, कोल्हापूर, दिल्ली येथील संग्राहकांकडून चित्रे मिळवण्यात एनजीएमएला यश आले आहे. धुरंधरांनी पौराणिक, सामाजिक, सांस्कृतिक अंगांनी कॅनव्हॉसवर उतरवलेल्या मराठमोळ्या संस्कृतीचा कलाविष्कार थक्क करीत आहे. हे प्रदर्शन येत्या 13 ऑक्टोबरपर्यंत रसिकांसाठी खुले आहे. देशभरातील संग्राहकांनी कोणत्याही मोबदल्याशिवाय, कोणताही खर्च न घेता आपापल्या संग्रहातील धुरंधरांची चित्रे प्रदर्शनासाठी पाठवली. दिवसागणिक प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती एनजीएमएच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष सुहास बहुलकर यांनी दिली.
स्त्रीया, पेहराव आणि आभूषणे
धुरंधर यांच्या चित्रांतील स्त्रीया, त्यांचे पेहराव आणि आभूषणे याबद्दल बारकावे सांगणारा अभिरुची ओक यांचा आर्ट वॉक गुरुवारी आयोजित करण्यात आला. लग्नसमारंभाचा प्रसंग दर्शवणारी त्यांची दोन चित्रे खूपच प्रसिद्ध आहे. या चित्रांतील स्त्र्ायांनी नेसलेल्या साडय़ा, अंगावर घातलेले दागिने, मंगळसूत्राची लांबलचक पोत त्यांची केशभूषा याबद्दल अभिरुची ओक यांनी माहिती देत जुना काळ डोळ्यांसमोर उभा केला आहे.
























































