कोकणाच्या धर्तीवर आता मराठवाड्यातील ग्रामीण पर्यटन विकासासाठी कार्यक्रम

कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमाच्या धर्तीवर मराठवाडा ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. मंत्रालयात यासंदर्भात बैठक झाली. बैठकीस ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंदकुमार, पर्यटन संचालक दिलीप गावडे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, ग्रामविकास विभागामार्फत कोकणातील ग्रामीण भागातील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी दिला जातो. अशीच योजना मराठवाड्यासाठी राबविता येईल.

मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अनेक ऐतिहासिक आणि पुरातन वास्तू, किल्ले, गुंफा, अभयारण्ये आदी पर्यटनस्थळे आहेत. याशिवाय कृषी आणि ग्रामीण पर्यटनालाही मराठवाड्यात मोठा वाव आहे. यातून मराठवाड्यातील पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची क्षमता आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काळात ग्रामविकास विभागामार्फत कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमाच्या धर्तीवर मराठवाडा ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम राबविण्यात येईल. यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना सत्तार यांनी दिल्या.

मराठवाडा ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्यात यावा, अशी सूचनाही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली. पर्यटन विभागाच्या सहयोगातून मराठवाड्यातील ग्रामीण भागातील पर्यटनस्थळे सुनिश्चित करुन त्यांचा विकास करणे, तिथे पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ग्रामीण विकास विभागामार्फत निधीची उपलब्धता करुन देणे याबाबतही यावेळी चर्चा झाली.

आपली प्रतिक्रिया द्या