
>> महेश कुलकर्णी
मध्यरात्रीच्या निरव शांततेत अचानक मोबाईल खणखणतो… मोबाईल कानाला लावताच समोरून हमसून हमसून रडण्याचा आवाज येतो… ‘दादा, बायको, लेकरं झोपल्यात म्हणून बोलतोय… घरदार, शेतशिवार वाहून गेलं… सरकार मदत देईना अन् बँका जगू देईनात.. दादा, काय करायचंय जगून? कशासाठी जगायचं?’ असा काळीज चिरणारा प्रश्न… हा प्रश्न एकाचा नाही, तर अनेकांचा आहे… थोडेथोडके नाही, तर मराठवाड्यातील हजारो शेतकरी नैराश्याच्या गर्तेत असून १७०० शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत. मन आणि उमेद खचलेल्या या शेतकऱ्यांना हवा आहे फक्त दिलासा… शिवार हेल्पलाईनचे विनायक हेगाना सांगत होते.
यंदा मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांत मे महिन्यापासून पावसाने धुमशान घातले. जून, जुलैमध्ये जेमतेम पडलेल्या पावसाने ऑगस्टअखेरीस रौद्ररूप धारण केले. सप्टेंबरमध्ये तर पावसाने प्रलंयकारी तांडव घातले. शेतामध्ये कंबरेएवढे पाणी साचले. मृतवत झालेल्या नद्यांना चार चार वेळा महापूर आला. यावर्षी खरिपाचा हंगाम तरारला होता. सोयाबीन, कापूस, मका, तूर, उडीद, बाजरीची पिके जोमात होती. पावसाने सगळे वाटोळे केले. शिवारात एक दाणाही शिल्लक राहिला नाही. कोरडवाहू काय, बागायती काय, सगळेच उद्ध्वस्त झाले. घरदार, संसार वाहून गेला. अंगावरचे कपडे तेवढे शिल्लक राहिले. निसर्गाचा अमानुषपणा पाहून शेतकरी हादरून गेला. जगायचे कसे? पोराबाळांना शिकवायचे कसे? लेकबाळ उजवायची कशी? कुठे मन मोकळं कराव, तर आभाळच फाटलेलं… त्याची जगण्याची उमेदच हरवली.
शिवार हेल्पलाईनने दिला आधार
जगण्याची ऊर्मीच घालवून बसलेल्या शेतकऱ्यांना गरज होती मोकळ्या संवादाची. शिवार हेल्पलाईनवर शेतकरी मोकळेपणाने बोलू लागले. दिवसभर हेल्पलाईनचा फोन खणखणू लागला. शिवार फाऊंडेशनच्या माध्यमातून २०१७ मध्ये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवार हेल्पलाईन सुरू करण्यात आली. या हेल्पलाईनच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधला जातो. २४ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या अवघ्या तीन आठवड्यात राज्यातील २६ जिल्हयातील ५४४६ शेतकऱ्यांनी आपली व्यथा ‘शिवार’ समोर मांडली. अगदी १५ वय वर्षांपासून ते पन्नाशी ओलांडलेल्यांचा यात समावेश होता. जवळपास हजार एक महिलांनीही फोन केले. यात सर्वाधिक फोन मराठवाड्यातील होते. २४ ते २९ सप्टेंबर या सहा दिवसांत सर्वाधिक २६४५ फोन आले. ‘साहेब, सरकारकडून आर्थिक आधार मिळाला अन् बँकांचा तगादा थांबला तरच आम्ही जगू. नाहीतर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही…’ असाच सूर !
काय आहेत शेतकऱ्यांच्या अडचणी…
अतिवृष्टीमुळे घायकुतीला आलेला शेतकरी अडकला आहे तो मायक्रो फायनान्स आणि बँकांच्या कर्ज वसुलीच्या मगरमिठीत. मराठवाड्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या शेतकऱ्यांचे कर्जही तुलनेने अल्पच आहे. परंतु अतिवृष्टीत खरिपाचा हंगाम हातून गेला. शेतकऱ्यांकडून आता कर्जवसुली केली नाहीतर ते बुडणार, असे गृहीत धरून बँका, मायक्रो फायनान्सवाल्यांनी पठाणी वसुली सुरू केली आहे.
सरकारकडून मदत मिळाली तरी ती तुटपुंजी असेल. त्यातच सणासुदीचे दिवस आहेत. परीक्षा शुल्क सरकारने माफ केले, पण मुलांच्या शाळांची फिस भरण्यासाठी तगादा लागला आहे. तुळशीच्या लग्नानंतर अनेकांनी मुलामुलींच्या लग्नाचे मुहुर्त धरले. सोयाबीन, कापसाच्या जिवावर लग्नसराई बहरणार होती. सगळेच बुडाले. अनेक शेतकऱ्यांची मुले स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती. त्यांचे स्वप्नही अतिवृष्टीने कुजवले.