‘मार्च एण्ड’च्या बेसुमार सरकारी खरेदीला चाप! प्रशासनाला आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अर्थसंकल्प वितरण प्रणाली सुरू करण्यामागे प्रत्येक सरकारी विभागाने दरमहा त्यांना उपलब्ध असलेल्या निधीचे नियोजन करून खर्च करणे अपेक्षित आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून प्रशासनातील आर्थिक शिस्तच बिघडली असून 31 मार्चला आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी खात्याचा निधी संपवण्यासाठी मंत्रालयात प्रचंड धावपळ सुरू होते. निविदा मंजूर करून खरेदी करण्यासाठी व कंत्राटदारांची बिले काढण्यासाठी रात्रीचा दिवस केला जातो. ‘मार्च एण्ड’च्या नावाखाली करण्यात येणाऱया बेसुमार सरकारी खरेदीला चाप लावण्याचा निर्णय वित्त विभागाने घेतला आहे. 1 फेब्रुवारीनंतर औषधे वगळता कोणत्याही प्रकारच्या खरेदी प्रस्तावांना मंजुरी देण्यात येऊ नये असे आदेश सर्व विभागांना देण्यात आले आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर राज्याची बिघडलेली अर्थव्यवस्था व प्रशासनाला आर्थिक शिस्त लावण्याचे प्रयत्न सरकारी पातळीवर सुरू करण्यात आले आहेत. प्रत्येक सरकारी विभागाने त्यांना अर्थसंकल्पात उपलब्ध करून दिलेल्या निधीचे नियोजन करून खर्च करणे अपेक्षित आहे. परंतु तसे न होता आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तीन म्हणजे जानेवारी ते मार्च या महिन्यात मोठय़ा प्रमाणात खर्च होतो. बऱयाच वेळा आपल्या विभागाला मिळालेला निधी अखर्चित राहिल्याने परत जाऊ नये यासाठी आयत्यावेळी अनावश्यक व प्राधान्यक्रम नसलेल्या बाबींवर खर्च केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. याची गंभीर दखल घेऊन 1 फेब्रुवारीनंतर कोणत्याही खरेदी प्रस्तावांना मंजुरी देऊ नये असे आदेश वित्त विभागाने दिले आहेत.

दैनंदिन खरेदीस मान्यता
चालू आर्थिक वर्षात कार्यालयांना लागणाऱया दैनंदिन वापरातील वस्तूंची खरेदी करता येईल, मात्र पुढील वर्षासाठी आगाऊ वस्तूंची खरेदी करता येणार नाही.
या वर्षी राज्याच्या महसुलात 11 टक्के वाढ अपेक्षित होती, परंतु पहिल्या सहामाहीत केवळ सात टक्के वाढ झाली आहे. यामुळे वर्षाच्या सुरुवातीला अपेक्षित असलेली महसुली तूटही मोठय़ा प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
फर्निचर दुरुस्ती, संगणक, झेरॉक्स मशीन किंवा त्यांच्या सुटय़ा भागांची खरेदी, नैमित्तिक कार्यशाळा, सेमिनारचे आयोजन, कार्यालय भाडय़ाने घेणे अशा कोणत्याही प्रस्तावांना मंजुरी देण्यात येऊ नये अशा स्पष्ट सूचना वित्त विभागाने दिल्या आहेत.
दिनांक 1 फेब्रुवारीनंतर कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात येणार नाही. प्रशासकीय मान्यता मिळाली असेल तरीही निविदा प्रसिद्ध करता येणार नाही.
केंद्रीय व राज्य हिस्सा योजना प्रकल्पांसाठीच्या खरेदी प्रस्तावांना निर्बंध लागू नाहीत. जिल्हा वार्षिक योजना स्थानिक निधीचे प्रस्ताव सादर करता येतील, मात्र त्याबाबतचा अंतिम निर्णय वित्त विभागाकडून घेण्यात येईल.