निवासी डॉक्टरांचा बेमुदत संप तूर्तास मागे, पूरस्थितीमुळे निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

राज्यभरात उद्भवलेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने उगारलेल्या ‘मेस्मा’च्या बडग्यानंतर सुमारे चार हजार निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या बेमुदत काम बंदचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे रखडलेले विद्यावेतन तसेच टीबी व प्रसूतीसाठीच्या रजेबाबत वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर तूर्तास हे आंदोलन मागे घेण्यात आले. विद्यावेतन वाढीबाबत महिनाअखेरपर्यंत सरकारने निर्णय न घेतल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा ‘मार्ड’ने दिला आहे.

बुधवारी सायंकाळी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयासोबत निवासी डॉक्टरांच्या संघटनेने बैठक घेतली होती. या बैठकीत नागपूर, लातूर, अकोला आणि अंबेजोगाई या ठिकाणी रखडलेले विद्यावेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच डॉक्टरांना टीबीची लागण झाल्यास आणि महिला डॉक्टरांना प्रसूतीसाठी रजा देण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय ‘मार्ड’ने  घेतला. राज्यातील पूरस्थितीमुळे संसर्गजन्य आजारांचा धोका लक्षात घेऊन आंदोलन 31 ऑगस्टपर्यंत मागे घेण्यात आल्याचे ‘मार्ड’च्या अध्यक्षा कल्याणी डोंगरे यांनी सांगितले.