
साप्ताहिक ‘मार्मिक’चा 65वा दिमाखदार वर्धापन दिन सोहळा उद्या प्रभादेवीतील रवींद्र नाटय़ मंदिरात होत आहे. यानिमित्त लोककलेच्या तरुण सेवेकऱयांचा ‘द फोक आख्यान’ हा कार्यक्रम होणार असून लोककला आणि मराठी संस्कृतीचा जागरच यावेळी होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला असणार आहे.
महाराष्ट्रामध्ये बारा कोसावर जशी बोलीभाषा बदलते, त्याच पद्धतीनं लोककलेची परंपरा, बाज, सादरीकरणाची पद्धत बदलते. ‘द फोक आख्यान’ म्हणजे मराठी संस्कार, परंपरा, संस्कृती यांना चिरंजीवी ठेवण्याचे ध्येय उराशी बाळगलेल्या कलाकारांची चळवळ आहे. पाश्चात्त्य कला वेगाने हात-पाय पसरू लागल्याने लोककला पूर्णपणे इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. असं होऊ नये म्हणून मराठी आख्यानकथा कलेचा मार्ग निवडून, गणापासून गोंधळापर्यंत नवीन रचना आणि चाली बांधून, मराठी लोककलेला तोच मान, सन्मान, लोकाश्रय मिळवून देण्यासाठी, तिच्या अस्सल मराठी संस्कारांची भुरळ पाडण्यासाठी, लोककलेचे सेवेकरी होऊन तरुण कलाकारांची ही चळवळ उभी राहिली आहे.
स्थळ – रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी
वेळ – सायं. 6 वा.