हळदीवर पाणी फेरले; लग्न मंडप भिजले, अवकाळीने लग्नाचा बॅण्ड वाजवला

अवकाळी पावसाचा मुक्काम वाढल्यामुळे मे महिन्यात होणाऱ्या लग्न समारंभांचा अक्षरशः बॅण्ड वाजला आहे. लग्नसराईचा शेवटचा महिना असल्याने मेमध्ये मोठ्या प्रमाणात विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पावसामुळे एकही विवाह सोहळा व्यवस्थित पार पडला नाही. काही ठिकाणी हळदी समारंभ सुरू असताना अचानक पाऊस आला आणि या समारंभांवर पाणी फेरले. बहुतेक ठिकाणी विजांच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटात भटजींना मंगलाष्टके उरकावी लागली आहेत. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसात मंडप फक्त भिजलेच नाहीत तर उडूनही गेले आहेत. मंडपाचे कापड फाटल्यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.

लग्नसराई जरी दिवाळीनंतर तुळशीचे लग्न झाल्यावर सुरू होत असली तरी बहुतेक लग्न समारंभ हे मे महिन्यात पार पडतात. मे महिन्यात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या लागतात. परीक्षा संपल्यामुळे मुलेही तणावाखाली नसतात. त्यामुळे वधू आणि वरांच्या नातेवाईकांची मे महिन्यात होणाऱ्या लग्नांना सर्वाधिक पसंती असते. लग्नाचा महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेमध्ये यंदा लग्नात पावसाचे मोठे विघ्न निर्माण झाले. अवकाळी पावसाचे प्रमाण प्रत्येक वर्षी हे तुरळक असते. मात्र यंदा या पावसाचा मुक्काम जवळपास महिनाभर राहिला. ठाणे जिल्हा आणि मुरबाड तालुक्यात 6 मेपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. अद्यापही या पावसाने उघडीप न दिल्याने याचा सर्वाधिक फटका लग्न समारंभांना बसला आहे. विवाह सोहळ्यात उटणे, हळदी आणि लग्न हे विधी महत्त्वाचे आहेत. मात्र पावसाने या सर्वच विधींवर पाणी फेरल्याने वऱ्हाडींच्या आनंदावर विरजण पडले आहे.

मठांतील जागाही उपलब्ध होईना
ग्रामीण भागात लग्नासाठी सभागृह उपलब्ध नसल्याने बांबूच्या काठ्यावर कापडी मंडप उभारले जातात. मात्र यावर्षी सततच्या अवकाळी पावसाने हे महागडे कापडी मंडप फक्त भिजलेच नाहीत तर वादळाने फाटून गेले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील या मंडप व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने तीर्थक्षेत्रावरील सार्वजनिक मठांवर काहींनी मोर्चा वळवला आहे. मात्र मागणी जास्त असल्याने तिथेही जागा उपलब्ध होत नाही. परिणामी काही वधू आणि वरांचे विवाह रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.