शहीद जवानांच्या कुटुंबीयांची दिवाळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गडचिरोली जिह्यात नक्षल्यांशी लढताना आतापर्यंत 209 पोलीस शहीद झाले आहेत. त्यात 166 जवान हे गडचिरोली जिह्याच्या आस्थापनेवरील आहेत. शहीद जवानांच्या कुटुंबीयांची दिवाळी आनंदात जावी म्हणून पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी त्यांना मिठाई, फराळ व फटाके वाटून त्यांच्याशी हितगुज केले. यावेळी शहीद जवानांचे कुटुंबीय भावुक झाले.

गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त असल्याने येथे नक्षली कारवाया होत असतात. नक्षल्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस जवान सतत डोळ्यात तेल ओतून पहारा देत असतात. दिवाळी असो की कोणताही सण, हे जवान आपल्या कर्तव्यावर तैनात असतात. आतापर्यंत जिह्यातील 166 जवान शहीद झाले आहेत. दिवाळीसारखा सण आल्यास कुटुंबप्रमुख नसल्याने शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या मनात अश्रू तरळतात. मात्र त्यांच्या आनंदावर विरजण पडू नये म्हणून शनिवारी पोलीस विभागातर्फे ‘शहीद कुटुंबीयांसोबत दिवाळी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गोंदिया जिह्याच्या जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, गडचिरोलीचे पोलींस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, अजयकुमार बन्सल, सौ. निधी बन्सल, उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले उपस्थित होते.