
जम्मू आणि कश्मीर येथील राजौरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेले जवान संदीप सावंत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अवघ्या 25 वर्षांचे असलेले संदीप सावंत दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांचे पार्थिव सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी मुंढे येथे आणण्यात आले. कराड शहरातील विजय दिवस चौकातून त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. संदीप सावंत अमर रहे अशा घोषणाही यावेळी करण्यात आल्या. पार्थिव मूळ गावी पोहोचल्यानंतर पंचक्रोशीतील ग्रामस्थ सावंत यांना अखेरची मानवंदना देण्यासाठी जमले होते. सैन्याकडून बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
संदीप सावंत यांच्या पश्चात पत्नी सविता, अवघी दीड महिन्यांची मुलगी, आई-वडील असा परिवार आहे. शहीद सावंत हे मराठा लाईट इंफ्रंट्रीतील जवान होते. नववर्षाच्या पहाटे संदीप सावंत यांच्या गस्ती पथकाला नियंत्रण रेषेजवळ जंगलात हालचाली दिसल्या. सावंत यांच्यासह पथकातले सगळे सहकारी सज्ज झाले. दहशतवादी घुसखोरी करत असल्याचे त्यांना दिसले. संदीप नाईक यांनी आणि त्यांच्या पथकाने दहशतवाद्यांशी दोन हात करण्यास सुरुवात केली. मात्र दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात संदीप सावंत आणि गोरखा रायफल्सचे अर्जुन थापा या दोघांना वीरमरण आलं.


























































