समर्थ भक्त मारुती बुवा रामदासी यांचे निधन

समर्थ रामदासस्वामी यांचे शिष्य परमपूज्य श्री श्रीधरस्वामी यांचे अनुग्रहित समर्थ भक्त मारुती बुवा रामदासी यांचे आज शनिवारी सकाळी सातारा येथे खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 84 वर्षे होते. हनुमान जयंतीच्या वेळी त्यांचा जन्म झाला म्हणून त्यांचे नाव मारुती असे ठेवण्यात आले. कोल्हापूर जिह्यातील बुवाचे वाठार येथे त्यांचा जन्म झाला.

सज्जनगडावर रामदासी म्हणून कार्यरत असलेल्या बुवांनी श्रीधरस्वामी यांचे मार्गदर्शन घेऊन आजपर्यंत रामदासस्वामी यांच्या विचारांचा प्रसार केला. अनेक पुस्तकांचे लेखन केले. मनाचे श्लोक, आत्मबोध यावर त्यांनी सज्जनगड मासिकातून विपुल लेखन केले. ‘साताराभूषण’ पुरस्कार प्राप्त झालेल्या बुवांनी सिंगापूर येथेही प्रचारासाठी समर्थ पादुका दौरा केला होता. देशात विविध राज्यांत पादुका दौरा करून समर्थ वाङ्मयाचा त्यांनी मोठा प्रसार केला. रविवारी सकाळी आठ ते दहा या वेळेत बुवांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी समर्थ सदन येथे ठेवण्यात येणार असून त्यानंतर सकाळी अकरा वाजता संगम माहुली येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत अशी माहिती मंडळाचे विश्वस्त योगेश बुवा रामदासी यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या