
ऑटो सेक्टरमधील मंदीचा फटका सर्वच कारनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना बसत आहे. यात देशातली आघाडीची कंपनी मारुती सुझुकीदेखील सुटू शकली नाही. मारुती सुझुकीने ऑक्टोबर महिन्यात आपल्या उत्पादनात 20.7 टक्क्यांनी घट केली आहे. गेले सलग नऊ महिने मारुती सुझुकीच्या उत्पादनात घट होत आहे. ऑक्टोबर महिन्यात मारुतीने 1 लाख 19 हजार 337 युनिटची निर्मिती केली आहे. हाच आकडा गेल्या महिन्यात 1 लाख 50 हजार 497 इतका होता. गेल्या महिन्यात मारुतीच्या पॅसेंजर कारच्या निर्मितीतदेखील घट झाली आहे. ऑक्टोबरमध्ये कंपनीने 1 लाख 17 हजार 383 पॅसेंजर कारची निर्मिती झाली. ही घट 20.85 टक्के असून हाच आकडा गतवर्षी ऑक्टोबरला 1 लाख 48 हजार 318 युनिट एवढा होता. अल्टो, वॅगनआर, सेलेरियो, स्विफ्ट, बलोनेसारख्या मिनी आणि कॉम्पॅक्ट सेगमेंटमध्येदेखील 21.57 टक्के घट झाली आहे. ऑक्टोबरला 85 हजार 64 युनिटची निर्मिती केली आहे. गतवर्षी हाच आकडा 1 लाख 8 हजार 462 एवढा होता.



























































